शिरवळ : येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीला कच्च्या मालाचा पुरवठा न करता पुरवठा करण्यात आल्याचा बनाव करीत कंपनीची १ कोटी ८० लाख १६ हजार ३४० रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आणखी एका संशयिताला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. विजय विलास सावंत (वय ३८, रा. शिरवळ, ता.खंडाळा) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, विजय सावंत याला न्यायालयाने गुरुवार दि. ३ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत मोटारकारसाठी लागणारे सुटे भाग पुरवठा करणारी एक कंपनी आहे. याठिकाणी हृषीकेश सारंग गुंजाळ (वय २९, रा. अहमदनगर, सध्या रा. शिरवळ ) हा गोदाम व्यवस्थापक म्हणून कामास होता. त्यावेळी गुंजाळ याने आपल्या अधिकारात पॅकेजिंग (कापूरव्होळ, ता. भोर, जि. पुणे) व श्री पॅकेजिंग खंडाळा येथील मालपुरवठा करणाऱ्या कंपनीची पुरवठादार म्हणून कंपनीत नोंद केली. दरम्यान, हृषीकेश हा टायको कंपनीत कच्च्या मालाची आवक व वितरण हे काम पाहत होता. यावेळी हृषीकेशने श्री पॅकेजिंग व वरद पॅकेजिंग या कंपनीच्या बिलांच्या आधारे टीई कनेक्टिव्हीटी या कंपनीला श्री पॅकेजिंगच्या नावे डिसेंबर २०११ ते मे २०१५ यापर्यंत कच्चा माल, वायर, हाउसिंग, टर्मिनल कनेकटर, पॅकेजिंग साहित्य, थ्रेड, टेप आदी कच्च्या मालाचा कंपनीला पुरवठा केल्याचा बनाव करून कंपनीची १ कोटी ८० लाख १६ हजार ३४० रुपयांची फसवणूक केली होती.याप्रकरणी हृषीकेश गुंजाळसह श्री पॅकेजिंग व वरद पॅकेजिंग या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हृषीकेश गुंजाळ हा फरार होता. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणातील अन्य एक संशयित विजय सावंत याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. हृषीकेश गुंजाळ याच्या कोठडीची मुदत संपल्याने आज (सोमवारी) त्याला न्यायालयासोमर उभे करण्यात आले. न्यायालयाने तीन डिसेंबरपर्यंत त्याच्या पोेलीस कोठडीत वाढ केली तर सावंत यालाही ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
पावणेदोन कोटींच्या अपहारप्रकरणी आणखी एक संशयित अटकेत
By admin | Published: November 30, 2015 10:49 PM