सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई मंगळवारी बाजारच्या दिवशीही सुरूच राहिली. आठवडा बाजाराचा दिवस असला तरी शहरात कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याने ठरावीकच विक्रेते आले होते. त्या सर्वांवर पालिकेने कारवाई केली.
तसेच नेहमी बसणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांना आतमध्ये जागा दिली. मात्र, ही कारवाई करीत असतना जुन्या भाजी मंडर्ईतील विक्रेत्याने या कारवाईला विरोध केल्याने काही काळ कारवाई थांबली होती. नगरपालिकेने पोलिसांना कळविले. मात्र, आमच्याकडे कोणतेही लेखी पत्र नसल्याने आम्ही येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.सावंतवाडी नगरपालिकेने मागील काही दिवसांपासून संत गाडगेबाबा भाजी मंडईमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई करताना जे जागा व्यापून बसले आहेत. तसेच ज्यांनी अनधिकृतपणे स्टॉल लावले त्या सर्वांवर कारवाई केली आहे. तर मंगळवारी आठवडा बाजार असल्याने काही फिरते विक्रेते दुकान लावून बसले होते. त्या सर्वांवर पालिकेने कारवाई केली.
दुपारी एक वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली ती दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये मंडईच्यासमोर मोठ्या प्रमाणात गावठी भाजी विक्रेत्या महिला बसत होत्या. त्यांनाही उठवून आतमध्ये जागा देण्यात आली आहे.शहरातील गांधी चौकात काही दुकाने लागली होती. यामध्ये झाडे विक्रीस आलेल्या व्यापाऱ्यांनाही उठविण्यात आले. तसेच जुन्या भाजी मंडईमध्ये काही विक्रेते हे भाजीची मोठी जागा व्यापून बसले होते. त्यांना दिलेल्या जागेतच बसावे अशी सूचना करण्यात आली आहे.
या सूचनेप्रमाणे काहींनी दिलेल्या जागेतच भाजी विक्री सुरू केली. मात्र एका विक्रेत्याने याला तीव्र विरोध केला. जर माझ्यावर कारवाई करता तर इतरांवरही कारवाई करा. तुम्ही जर त्यांना मोठी जागा देत असाल तर मग आम्ही दिलेल्या जागेत का बसायचे? असा सवालही यावेळी या विक्रेत्याने केला.दरम्यान, या कारवाईमुळे स्थानिक गावठी भाजी विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. ही कारवाई चुकीची असल्याचेच मत अनेकांनी मांडले. गणेश चतुर्थीपूर्वी अशी कारवाई करणे योग्य नाही, असे यावेळी या गावठी भाजी विक्रेत्यांचे मत होते. भाजी मंडईच्या समोरच्या जागेवरून स्थानिक गावठी भाजी विक्रेत्या महिलांना उठविल्याने आता ती जागा मोकळी झाली असून, तेथे बांबूचे कुंपण करण्यात आले आहे.तसेच त्या जागेत दुचाकीचे पार्किंग करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या कारवाईत बांधकाम अभियता संतोष भिसे, आरोग्य विभागाच्या रसिका नाडकर्णी, दीपक म्हापसेकर, विनोद सावंत, मनोज सुकी, प्रदीप सावरवाडकर, गजानन परब, रिझवान शेख, बाबा शेख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.पोलिसांना कुठलाही लेखी आदेश नाही, विरोधी पथक दाखलभाजी मंडईमध्ये एका विक्रेत्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईस विरोध करीत दुकान काढणार नसल्याचा पवित्रा घेतला. याची पालिकेने पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे वाहतूक पोलीस तेथे दाखल झाले होते. पण पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी नगरपालिकेकडून आम्हांला कोणतेही लेखी पत्र मिळाले नाही किंवा त्यांचा अर्जही आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.पोलीस पथक तेथे दाखल झाले नाही. एक वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाला. त्याने सर्व परिस्थिती बघितली. त्यानंतर तो पोलीसही तेथून निघून गेला. मात्र या विक्रेत्याने मोबाईल चित्रण करीत आपण दुकान हलवणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर नगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकही तेथून निघून गेले.