रत्नागिरी : पर्ससीन नेटधारक मच्छीमारी नौकांमुळे जिल्ह्यातील मच्छीमार उध्वस्त होणार असल्याची भिती मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पर्ससीन नेटच्या विरोधात मच्छीमारांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पर्ससीन नेटधारक मासेमारी नौकांनी समुद्रामध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याचे परिणाम इतर मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशीच स्थिती राहिली तर किनारपट्टीवरील छोटे मच्छीमार उध्वस्त होणाची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर दररोज सुमारे ३५० पर्ससीन नेटधारक मासेमारी नौका बेकायदेशीरपणे मच्छीमारी करत असतात. त्यांच्याकडून अनियंत्रित व बेकायदेशीरित्या मासेमारी करण्यात येत असल्याचा आरोप मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. पर्ससीन नेट मासेमारीमुळे छोट्या व पारंपारिक मच्छिमारांना मासे मिळणे कठीण झाले आहे. पर्ससीन नेटने करण्यात येणाऱ्या मासेमारी विरोधात इतर मच्छिमारांनी ओरड केल्यास त्यांच्या विरोधात मत्स्य विभागाकडून तात्पुरती कारवाई करण्यात येते. मात्र, त्यानंतर दोन-तीन दिवसांत पुन्हा ही बेकायदेशीर मासेमारी सुरु होते. त्यासाठी मत्स्य विभागाने पर्ससीन नेटच्या विरोधात ठोस पावले उचलून कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी पारंपारिक मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. पर्ससीन नेट मासेमारीबाबत मच्छिमारांमध्ये दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे. त्यांच्याबाबत मत्स्य विभागाने ठोस कारवाई न केल्यास हे आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी मत्स्य विभागाने कायमचा तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. हे आंदोलन पेटल्यास मच्छिमारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे या मच्छिमारांकडून म्हटले जात आहे. (शहर वार्ताहर)नौकांचा धुमाकूळ : मच्छीमार उध्वस्त होण्याची भीती---२९ रोजी आंदोलनपर्ससीन नेट नौकांद्वारे सुरु असलेल्या बेकायदेशीर मासेमारी विरोधात मच्छीमार एकवटले आहेत. या मासेमारी विरोधात २९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय, परटवणे, रत्नागिरी येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे.छोट्यांवर अन्याय---पर्ससीन नेटने मच्छमारी करणाऱ्या मच्छिमारांमुळे स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होत असल्याची ओरड होत आहे. पर्ससीन नेटविरोधात गेली अनेक वर्षे संघर्ष सुरु आहे. मात्र, गेल्या काही वर्षात हा प्रश्न मागे पडला होता.
पर्ससीनविरोधी आंदोलन पेटणार
By admin | Published: October 26, 2015 11:17 PM