कणकवली : कणकवली नगरपंचायत प्लेग्राऊंड गार्डन परमहंस भालचंद्र महाराज आश्रमानजीक कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने अप्पासाहेब यांचा साडेपाच फूट उंच व ७० किलो वजनाचा पुतळा असणार आहे. हा पुतळा फायबरचा असणार आहे. किमान ५० ते ६० वर्षे या पुतळ्याचा टिकाऊपणा असेल. अप्पासाहेब पटवर्धनांचा पूर्णाकृती पुतळा २९ आॅगस्ट रोजी आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते कणकवली मुख्याधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. कणकवलीत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बांधकाम सभापती संजय कामतेकर उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, कणकवलीचे महान कर्मयोगी अप्पासाहेब पटवर्धनांची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत जतन राहण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची संकल्पना व नियोजन आमदार राणे यांनी केले आहे. तब्बल ६ फूट ६ इंच उंचीचा अप्पासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा कसबा डिझाईन्स प्रा. लिमिटेड या कलासंस्थेच्या माध्यमातून कल्याणमधील प्रसिद्ध व्यक्तीशिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडून घडविण्यात आला आहे.
कणकवलीचा ऐतिहासिक वारसा जपणारा हा पुतळा कणकवली नगरीला हस्तांतरीत करण्याचा समर्पण सोहळा २९ आॅगस्ट रोजी कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुतळ्याचे कणकवली नगरपंचायतीच्या नव्याने येऊ घातलेल्या प्रकल्पांतर्गत, सर्व शासकीय नियमांची पूर्तता करून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने लोकार्पणही करण्यात येईल, असे समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.