सावंतवाडी : गेल्या काही दिवसांत उष्णतेचे प्रमाण वाढले आहेत. आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांना उन्हात गेल्यामुळे अचानक उष्माघात जाणवतो. त्यांनी सावधानता बाळगावी. तसेच नाकातून रक्त येणाऱ्यांनी नाकावर बर्फ ठेवावा, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे. सावंतवाडीत असे प्रकार घडले असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आपल्या शरीराचे तापमान नेहमी ३७ अंश सेल्सिअस असते. या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. पण घामाच्या रुपाने पाणी बाहेर जाते व शरीर ३७ अंश सेल्सिअस तापमान कायम राखते. सतत घाम आल्यास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आणि अत्यावश्यक आहे.पाणी शरीरात इतरही अनेक महत्त्वाची कामे करते. त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंशाच्या पुढे जाते आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंशच्या पुढे जाऊ लागते.
शरीराचे तापमान जेव्हा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातले प्रोटिन अक्षरश: शिजू लागते. (उकळत्या पाण्यात अंडे उकडते तसे). स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात, हे उष्माघातात होते.रक्तातले पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते. रक्तदाब अत्यंत कमी होतो. महत्त्वाच्या अवयवांना (विशेषत: मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो. माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढवतो, असे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले. उन्हाळ््यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे-थोडे पाणी पीत रहावे व आपल्या शरीराचे तापमान ३७ अंशच कसे राहील, याकडे लक्ष द्यावे व उष्माघात टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्माघाताचा परिणाम वयस्कर व्यक्ती, खेळाडू, लहान मुले, फिरतीवरील कामगार यांना होऊ शकतो. उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, थंड पाण्याने आंघोळ करावी, बंद कारमध्ये बसू नये, असे डॉ. राजेश नवांगुळ यांनी म्हटले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी डॉक्टरांच्या टीप्सघाम न येणे, त्वचा कोरडी, गरम व लाल होणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी, उलट्या व बेशुद्धपणा अशी उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. राजेश नवांगुळ यांनी केले आहे.उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत करा. काम करताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबून पाणी प्या. शक्यतो सुती (कॉटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा. डोक्यावर रुमाल, टोपी इत्यादींचा वापर करा.आहारात ताक-दही इत्यादींचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळावा. कोल्ड्रिंक ऐवजी लिंबू सरबत, नारळपाणी याचा वापर करा. दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळावा.लहान मुले, गरोदर माता, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडू देऊ नका. अशक्तपणा, थकवा, ताप-उलट्या इत्यादी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.