देवगड : देवगड तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकींसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ७ सरपंच पदासाठी २५ तर सदस्य पदासाठी ९७ असे एकूण १२२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २६ डिसेंबर २०१७ रोजी होणाऱ्या देवगड तालुक्यातील फणसगांव, पावणाई, वळिवंडे, वानिवडे, शिरवली, विठ्ठलादेवी, रामेश्वर या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रामेश्वर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ७ व ९ सदस्य पदासाठी २४, वळिवंडे सरपंच पदासाठी ४ व सदस्य पदासाठी २०, पावणाई सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ९, वानिवडे सरपंच पदासाठी २ व सदस्य पदासाठी १०, विठ्ठलादेवी सरपंच पदासाठी ४ सदस्य पदासाठी १६, फणसगाव सरपंच पदासाठी ३ सदस्य पदासाठी १६, शिरवली सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदासाठी २ असे ग्रामपंचायत निहाय सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
शिरवली ग्रामपंचायतीच्या ७ सदस्य पदासाठी दोनच अर्ज दाखल झाले आहेत. तर पाच जागा रिक्त राहणार आहेत. १२ डिसेंबर रोजी छाननी होणार असून १४ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर १४ डिसेंबर रोजी चिन्हे वाटप करुन उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. मतदान २६ डिसेंबर रोजी तर मतमोजणी २७ डिसेंबर रोजी आहे.