सावंतवाडी : कोरोनाच्या काळात निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आज मंगळवार पासून मालवण, वेंगुर्ला नगरपालिकेवर तर उद्या, बुधवार पासून सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यासाठी नगरविकास खात्याकडून प्रांताधिकार्यांना पदाचा कार्यभार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे परिपत्रक प्रत्येक नगरपालिकेला देण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाल पालिका प्रशासन प्रशासक हाती जाणार असून निवडणूक होईपर्यंत हा कार्यभार घेणार आहेत.सावंतवाडीत तर नगरपालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवक याची मुदत ही १६ डिसेंबर ला संपत होती. मात्र आणखी दहा दिवस कालावधी वाढवून मिळेल अशी आशा विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवक यांना होती. पण फक्त चार दिवस वाढले असून मंगळवारी सावंतवाडीतील नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यभार समाप्त झाला आहे. उद्यापासून सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर हे प्रशासक म्हणून आपण कार्यभार स्वीकारणार आहेत.सावंतवाडी पालिकेसह मालवण वेंगुर्ला नगर परिषदांची मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास विभागाकडून सोमवारी रात्री उशिरा हे परिपत्रक काढण्यात आले असून ते प्रथम जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी त्याची तत्काळ अंमलबजावणी केली असून तसे आदेश सावंतवाडी वेंगुर्ले मालवण नगरपालिकांना ही काढले आहेत. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.कोविड-१९ च्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्यात येत असते.
सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 5:06 PM