सिंधुदुर्ग : कोकण विद्यापीठाच्या स्थापनेबाबत अभ्यास गटाकडून अभ्यास केला जात असून, पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांचे मत घेण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या उपकेंद्रांमध्ये दोन महिन्यांत संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सुचना मांडली होती. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर भौगोलिक अंतरामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्यास अडचणी येतात.
सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांना सेवा देण्यास मुंबई विद्यापीठ अकार्यक्षम ठरत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी लक्षवेधी सुचनेद्वारे आमदार डावखरे यांनी केली. कोकण विद्यापीठाच्या स्थापनेबाबत वर्तमानपत्रातही बातमी प्रसिद्ध झाल्या होत्या, त्याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचा कारभार सुस्थितीत चालण्यासाठी संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली.त्यावेळी उच्च-तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, ैैस्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून अभ्यास सुरू आहे. तर पुढील काळात स्वतंत्र विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांच्याही भूमिका जाणून घेण्यात येतील. कोकण विद्यापीठाबाबत शासनाचा निर्णय जाहीर होईल. अभ्यास गटाचा निर्णय येईपर्यंत येत्या दोन महिन्यांत विद्यापीठाच्या उपकेंद्रांमध्ये संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.''
राज्य सरकारची भूमिका दुटप्पी : निरंजन डावखरेकोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ जाहीर करण्याचे वृत्त जानेवारीमध्ये वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारकडून कोकण विद्यापीठाबाबत दुटप्पी भूमिका घेतली जात आहे, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला.