सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सन २०१६-१७ च्या ४७ लाख ७७ हजार रुपयांच्या प्रारुप विकास आराखड्यास शनिवारच्या बांधकाम समिती सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेची बांधकाम समितीची सभा सभापती संजय बोंबडी यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी सदाशिव ओगले, रुक्मिणी कांदळगांवकर, पंढरीनाथ राऊळ, विष्णू घाडी, आत्माराम पालयेकर, दीपलक्ष्मी पडते आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा सन २०१६-१७ च्या ४७ लाख ७७ हजार रुपयांच्या प्रारुप विकास आराखडा आजच्या बांधकाम समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रारुप आराखड्यावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. तर १३ व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून करण्यात येणाऱ्या कामांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. याबाबत जिल्ह्यात तालुकानिहाय सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असता अद्यापही बरीच कामे अर्धवट स्थितीत असल्याचे उघड झाले तर ही कामे ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण होऊन शंभर टक्के निधी खर्च व्हावा या दृष्टीने प्रयत्न करा. निधी परत गेल्यास संबंधितांना जबाबदार धरले जाईल असे आदेश यावेळी बांधकाम सभापती संजय बोंबडी यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यावर तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. मात्र, अद्याप ती तोडण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तरी अशी धोकादायक ठिकाणची झाडी तत्काळ तोडावी. सर्व मार्ग सुरक्षित करावेत असे आदेश यावेळी सभापती संजय बोंबडी यांनी दिले. (प्रतिनिधी)
४७ लाखांच्या आराखड्यास मंजुरी
By admin | Published: November 07, 2015 10:13 PM