खेड : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत महिपतगडापासून ७ किमी अंतरावर दक्षिणेस असलेल्या अत्यंत कठीण, खडतर व अवघड मार्गावर वसलेल्या सुमारगडावर काही पुरातन वास्तू आढळुन आल्या आहेत. ४ गुंफा आणि ४ खांबटाकी यांच्यासह काही ऐतिहासिक वास्तू आढळल्याने गडाच्या अस्तित्त्वाबद्दल आता तज्ज्ञांमध्येही औत्सुक्य निर्माण झाले आहे.हे प्राचीन अवशेष गडावर पोहोचलेल्या इतिहास अभ्यासकांना आढळले आहेत. याच अवशेषांवरच आता संशोधन करण्यात येणार आहे. कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी यांनी आता प्राचीन काळीताल वास्तूंच्या संशोधनास अधिकच चालना मिळणार असल्याचे सांगितले.इतिहास अभ्यासक प्रवीण कदम आणि गडकोट प्रतिष्ठानचे नितीन दिवटे यांनी हे संशोधन केले असून, ते इतिहासासाठी लाभदायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने अभ्यासकांनी मात्र आता त्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. तेथील पाहणीनुसार या किल्ल्याभोवती चारही बाजुला युध्दचौक्या व बांधकामासाठी काळ्या दगडाचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवाय नैसर्गिक तटबंदीही आहे.उंच शिखरावर हा किल्ला बांधण्यात आल्याने किल्ल्यावर चढून जाण्यास अथक प्रयत्न करावे लागत आहेत. रसाळगडापाठोपाठ सुमारगडदेखील जगाच्या नकाशावर येण्याच्या दृष्टीने लगतच्या गावातील ग्रामस्थांनी आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याअगोदर मोठ्या पाण्याच्या टाक्यांखेरीज अन्य वास्तू अथवा प्राचीन अवशेषांचा शोध लागत नव्हता. गडाचे अस्तित्व अबाधित राखण्याच्यादृष्टीने तेथील ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून गडावर जाण्यासाठी वाट बनविणे, स्वच्छता करून धोक्याच्या ठिकाणी पायऱ्या तयार करणे आणि वाटेवरील झुडपे तोडणे आदी कामे केली आहेत. मालदे गावातील भार्गव चव्हाण यांनी याकामी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने गडावर जाण्यासाठी सुमारे ३२ फूट लांबीची लोखंडी शिडी तयार करण्यात आली आहे. याच शिडीवरून गडावर पोहोचलेल्या अभ्यासकांना गडावर भुयारे, गुंफा, खांबटाकी, किल्ल्याच्या मूळ प्रवेशाच्या पायऱ्या, कातळावर केलेली कोरीव लेणी, मंदिराची मध्ययुगीन जोते, चुन्यातील बांधकामे आदी अवशेष आढळले. या सर्व वास्तूंची आता अभ्यासक प्रवीण कदम यांनी शास्त्रशुध्द पध्दतीने मोजमापे घेतली आहेत. याचा मागोवा इतिहासतज्ज्ञ घेणार आहेत़ यामुळे मध्ययुगीन व प्राचीन संशोधनास अधिकच चालना मिळणार असल्याचे कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सुमारगडावर आढळल्या पुरातन वास्तू
By admin | Published: March 27, 2016 9:59 PM