कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय, परजिल्ह्यातील तलाठी तसेच भाजप आणि शिंदेसेनेतील कार्यकर्त्यांना शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. हे परवाने देताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. तसेच जिल्ह्यातील शेतकरी शेती संरक्षक शस्त्र परवाने न मिळालेल्या ८०० शेतकऱ्यांना घेऊन लवकरच ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली येथील विजय भवन मध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करत संगनमताने जिल्ह्याबाहेरील लोकांना शस्त्र परवाने दिले आहेत. जिल्ह्यातील ८०० हून अधिक शेतकरी वारस हक्क परवान्याची मागणी करत आहेत. ४०० हून अधिक शस्त्रे ही पोलिस ठाण्यात जमा आहेत. वारस तपास न झाल्याने या बंदुका जमा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक वर्ष या बंदुका पोलिस ठाण्यामध्ये सडत आहेत. असे असताना सुद्धा सिंधुदुर्गच्या यापूर्वीच्या जिल्हाधिकारी व आताचे जिल्हाधिकारी यांनी केवळ ३० लोकांना परवाने दिले आहेत. यातील २० भाजपा व शिंदेसेनेचे कार्यकर्ते आहेत. तर उर्वरित परवानाधारकांमध्ये यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे खास असलेले बीड येथील तलाठी आहेत. त्यांना आत्मसंरक्षण परवाना देण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे एक निकटवर्तीय हे ठाणे येथे राहतात. मात्र, त्यांना परवाना सिंधुदुर्गात दिला आहे. सिंधुदुर्ग बाहेरील लोकांना परवाने दिले जातात. मात्र, सिंधुदुर्गातील मागणी करत असलेल्या शेतकऱ्यांना शस्त्र परवाने दिले जात नाहीत. ही खेदजनक बाब असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. ते म्हणाले, वन्य जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असून याकरिता शेती संरक्षण शस्त्र परवाने दिले जातात. मात्र, सिंधुर्गात परवाने जास्त होतात असे जिल्हाधिकारी म्हणत असतील तर मुळात यापूर्वी दिलेले परवानेच वारसांना द्यायचे आहेत. नवीन परवाने द्यायचे नाहीत. सिंधुदुर्गात बेकायदेशीर शिकार किंवा बंदूक परवाना यांचा गैरवापर शेतकऱ्यांकडून केला जात नाही. मात्र शेतकऱ्यांना परवाना देण्याऐवजी एका निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाला परवाना देण्यात आला. त्याने त्या परवान्याचा गैरवापर केला. यामुळे अधिकाऱ्यांना एक व सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक नियम प्रशासन लावत आहे.
पालकमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी जमीन प्रकरणात ज्या व्यक्तीवर आरोप केला होता. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील लोकांना शस्त्र परवाना दिल्या प्रकरणी आम्ही आंदोलन छेडणार असून याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार करणार आहे. याबाबत कायदेशीरदृष्ट्या काय करता येईल ? याबाबतही कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी शस्त्र परवान्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज दिला आहे. त्यांनी तो अर्ज आपल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा. तसेच भाजप व शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या आसपासच्या लोकांना शस्त्र परवाने मिळत नसल्याप्रकरणी पाठपुरावा करण्याची गरज आहे. असे सांगतानाच यावेळी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने परवाना दिलेल्या परवानाधारकांची नावे वाचून दाखवली.