मालवण : काँग्रेस पक्षाला नमविण्यासाठी भाजप-शिवसेनेची युती होणार असून, युतीसाठी शिवसेनेसमवेत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. मालवणच्या जनतेच्या सन्मानासाठी ही युती केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप आठ जागांवर निवडणूक लढविणार असून, युतीच्या गणितात शिवसेनेला नऊ जागांसह नगराध्यक्षपदही ‘तडजोड’ करून ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.मालवण येथील भाजप कार्यालयात जठार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, भाऊ सामंत, विलास हडकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, मनोज मोंडकर, पंकज पेडणेकर यांच्यासह राजन वराडकर हे उपस्थित होते.पत्रकार परिषदेत भाजपने आठ जागांपैकी पहिल्या टप्प्यात पाच जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तालुकाध्यक्ष मोंडकर यांच्या वक्तव्यानुसार राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेविका पूजा करलकर हे भाजपमध्ये दाखल होणार आहेत. प्रभाग १ मधून अरविंद मोंडकर, प्रभाग २ मधून राखी नितीन हडकर, प्रभाग ५ मधून पूजा प्रसाद सरकारे, प्रभाग ६ मधून राजन वराडकर, प्रभाग ७ मधून पूजा करलकर या पाच जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, तर प्रभाग चार येथील दोन्हीही जागा व प्रभाग ७ येथील एक जागा अशा तीन जागा भाजप लढविणार आहे. २९ ला उमेदवारी अर्ज दाखल प्रमोद जठार म्हणाले की, काँग्रेसचा पराभव हेच भाजपचे लक्ष्य आहे. काँग्रेस सोडून सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविणार असले तरीही आम्ही तडजोड करण्यास पुढाकार घेऊ. काँग्रेसमुक्त मालवण पालिका असा नारा सत्यात उतरवायचा आहे. भाजपकडून २९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल होतील.नगरसेवकांचे राजीनामे राष्ट्रवादीचे वराडकर व पूजा करलकर यांनी भाजपात प्रवेश केला नसला तरी त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. नगरसेवक पदांचा दोघांनीही राजीनामा दिला आहे, असेही जठार यांनी स्पष्ट केले. युतीबाबत अद्याप निर्णय नाही : आमदार नाईक भाजपने जरी शिवसेनेसोबत युती झाल्याचे स्पष्ट केले असले तरी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी ही माहिती खोडून टाकताना युतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सांगितले. तसेच युतीबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त झाले नसल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले.
मालवण येथे सेना-भाजपची युती होणार
By admin | Published: October 27, 2016 9:26 PM