कणकवली : महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात बांधण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे आरसीसी गटार, ड्रेनेज व्यवस्था, बॉक्सेलचे निकृष्ट बांधकाम, खचलेले रस्ते याबाबत त्वरित योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बॉक्सेल पुलाचे काम निकृष्ट आहे. एस. एम. हायस्कूलनजीकचे बॉक्सेल पूल रद्द करून तेथे उड्डाण पूल होण्याबाबत आश्वासन मिळाले होते; पण त्याची अजूनही पूर्तता झालेली नाही. शहरात नाले, मोऱ्या बांधताना पाण्याच्या प्रवाहाचे नियोजन केलेले नाही.
श्रीधर नाईक उद्यानाची जागा चौपदरीकरणात बाधित झाल्याने शासनाने नव्याने मध्यवर्ती ठिकाणची जागा संपादित करून उद्यान बांधावे, पाण्याचा निचरा होण्यासाठी काढलेले कॅनॉल हे आरसीसी करावेत. नियोजन लक्षात घेऊन ड्रेनेजची व्यवस्था करावी, सर्व्हिस रस्त्यावर पथदीप बसवावे व आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, रिक्षा स्टँड, ट्रक, टेम्पो वाहनतळाची व्यवस्था करावी, गडनदी ते जानवली नदीपर्यंत भागात सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी.अर्धवट इमारतींचे असेसमेंट नगरपंचायत दप्तरी रद्द करण्यात आलेले नाही, ते त्वरित रद्द करून फुली मारलेल्या अर्धवट इमारती अनधिकृत ठरवून पाडण्यात याव्यात. आरओडब्ल्यू लाईनपासून ६ मीटर अंतराच्या आत नवीन बांधकामास परवानगी देऊ नये, तेथे पुन्हा केलेले बांधकाम निर्लेखित करण्यात यावे. शहरातून गेलेल्या उड्डाण पुलास प. पू. भालचंद्र महाराजांचे नाव द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन दिले आहे.