कुडाळ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लवकरात लवकर करुन त्यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून प्रबोधनवादी चळवळीला न्याय द्यावा, असे मागणी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्यावतीने कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संस्थेच्यावतीने कुडाळ शहरातून मारेकऱ्यांच्या शोध लावला नसल्याबद्दल तीव्र घोषणाबाजीत निषेध रॅलीही काढण्यात आली.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण हत्येला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली. तरीही मारेकऱ्यांचा तपास लागला नाही. मारेकऱ्यांचा तपास लवकरात लवकर करावा व मारेकऱ्यांसह अशा विघातक प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्यावतीने कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कुडाळ पोलीस ठाणे अशी रॅली काढली. या रॅलीमध्ये संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, राष्ट्रसेवादलाचे देवदत्त परुळेकर, मंगल परुळेकर, बॅ नाथ पै कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, रुपाली नार्वेकर, शिल्पा मराठे, सोनाली राऊत, गितांजली बिर्जे, गीताली चव्हाण, प्रियांका तेंडुलकर, अभिजीत शेटकर, बॅ नाथ पै सेंट्रल स्कूलचे प्राचार्य फ्रान्सिक फर्नांडिस, अभिजीत परब, शाम तेंडोलकर, आनंद मेस्त्री, प्रसाद गावकर, नागराज सुनगार, शिवगौडा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना व कुडाळ बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील अंतर्भुत अभ्यास क्रमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या शेवटी घेण्यात आलेल्या सभेत अनेक मान्यवरांनी डॉ. दाभोळकर यांना मारून प्रबोधन संपणार नाही तर अनेक दाभोळकर निर्माण होतील आणि अन्याय व फसवणूक करणाऱ्या विघातक प्रवृत्त्तींना आळा बसेल, अशा आशयाचे मनोगत व्यक्त केले. काहींनी डॉ. दाभोळकर यांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरीक भावूक झाले होते. यासभेवेळी निषेधाच्या व मारेकऱ्यांच्या विरोधात तीव, घोषणा देण्यात आल्या. शेवटी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना मारेकऱ्यांचा तपास लवकरात लवकर करावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना अटक करा
By admin | Published: August 20, 2015 10:44 PM