कणकवली: कणकवली रेल्वे स्थानक परिसरात चैन स्नॅचिंग करणारा आंतरराज्य गुन्हेगार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानूसार सापळा रचून कणकवली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाने संशयित आरोपी दिलीप गोपाळ मिश्रा(२५ रा. रायसेन,मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.चौकशी अंती त्याचा अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली तालुक्यात संबधित आरोपी फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमित यादव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पथकाने त्याचा कणकवली परिसरात शोध घेतला. त्यावेळी दिलीप मिश्रा हा संशयित आरोपी नरडवे नाका बसस्टॉप जवळ संशयास्पदरित्या फिरत असताना आढळून आला.त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यास आणण्यात आले.त्यानंतर अधिक चौकशी केली असता पनवेल रेल्वे पोलिस ठाणे येथील एका चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मागील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी दिलीप मिश्राच असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर मुर्देश्वरा पोलीस ठाणे(भटकळ, राज्य कर्नाटक),पनवेल रेल्वे पोलिस ठाणे, कल्याण रेल्वे पोलिस ठाणे,सिकंदराबाद रेल्वे पोलिस ठाणे, (राज्य हैदराबाद) या ठिकाणी रेल्वेमधील १४ ते १५ चेन स्नेचिंग व जबरी चोरीचे अनेक गुन्हे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तसेच दिलीप मिश्रा याची अधिक चौकशी केली असता त्याने २९ ऑक्टोबर २०२३ रोजी कणकवली रेल्वे स्थानक येथे सुनीता सूर्यकांत पाताडे (रा. करंजे, आपटेवाडी, तालुका कणकवली) हिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची माळ जबरीने खेचून नेली असल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने कणकवली पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार चंद्रकांत झोरे व शिपाई माने यांनी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक शरद देठे हे करीत आहेत.
रेल्वेमध्ये चैन स्नॅचिंग करणाऱ्यास अटक, कणकवलीत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 1:04 PM