कणकवली : वारंवार सूचना देवूनही तपासणीकरीता रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे . मंगळवार पासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वेनेरत्नागिरी, सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात याबाबतची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.कोव्हिडचा धोका पूर्णतः टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी करत आहे. याकरीता रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रवाशांनी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे. असे आव्हान गेले काही दिवस कोकण रेल्वे करत आहे.
या आवाहनाला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.मात्र काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबले जाणार आहे.यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशाना ट्रेनच्या बाहेरच रहावे लागण्याची भीती आहे.कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी कोकण रेल्वे सर्व त्या खबरदारी घेत आहे.केले जाणारे सर्व उपाय हे प्रवाशांच्या आरोग्याच्या हिताचे आहेत.या सगळ्याकरीता कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व स्थानकात अहोरात्र मेहनत घेत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाशांची साथ अपेक्षित आहे.त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी निर्धारित वेळे पूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचणे आवश्यक आहे. अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर प्रवाशांची ट्रेन चुकू शकते. याची नोंद प्रवाशांनी घ्यावी. असे आवाहन कोकण रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.