चिपळूण : कलाकारापेक्षा कला व कलाकृतीचे आयुष्य अधिक असते. कलाकार हा जन्माला येतो व काही कालावधीनंतर कलाकाराच्या जीवनाचा अंत होतो. परंतु, कला व कलाकृती अजरामर राहते, असे विचार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार वासुदेव कामत यांनी व्यक्त केले. चिपळूण तालुक्यातील सावर्डे कला महाविद्यालयातर्फे अध्यक्ष प्रकाश राजेशिर्के यांच्या सहकार्याने गांग्रई येथे कला संस्कृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, जिल्हा परिषद सदस्य बुवा गोलामडे, गांग्रईचे उपसरपंच विजय जौरत, माजी पोलीसपाटील विनायक मालसे, मालदोलीचे माजी सरपंच विजय भोंबेकर, सीमा चव्हाण, युगंधरा राजेशिर्के, धोंडू नवरत, सुभाष शिर्के, जी. जी. पैलवान, फारुक नदाफ, श्रीकांत कांबळे, विजय बोधनकर, रेखा भिवंडीकर, प्रा. रुपेश सुर्वे, प्रा. माणिक यादव आदी उपस्थित होते. यावेळी चित्रकार कामत यांनी आमदार चव्हाण यांचे हुबेहुब व्यक्तीचित्र रेखाटले.गांग्रई येथे प्रा. प्रकाश राजेशिर्के यांच्या पुढाकाराने भरवलेल्या या संस्कृती कार्यशाळेला दोन दिवसात राज्यातील अनेक मान्यवर चित्रकारांनी भेट दिली. प्रा. वासुदेव कामत, प्रा. जयप्रकाश जगताप, फारुक नदाफ, रावसाहेब गुरव, श्रीकांत कदम, रेखा भिवंडकर, विजयराज बोधनकर, श्रीकांत कांबळे, रितेश जाधव, जे. जी, पैलवान, दीपक सोनार आदींचा समावेश होता. सोमवारीही आणखी काही कलाकारांनी कार्यशाळेला हजेरी लावली. दि. ३ डिसेंबरपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे. या कार्यशाळेत निसर्गचित्र, कोकणी राहणीमान व येथील जनजीवन, व्यक्तीरेखा यावर अधिक भर देण्यात आला आहे. कोकणातील संस्कृतीचे दर्शन यातून मांडण्यात आले आहे. या कार्यशाळेला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)
कलाकाराची कला व कलाकृती अजरामर राहते
By admin | Published: November 30, 2015 9:50 PM