वैभववाडी : प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत छेडल्या जाणाऱ्या आंदोलनाची शासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे अरुणा प्रकल्पग्रस्तांनी सामाजिक कार्यकर्त्या तथा ह्यनर्मदा बचावह्णच्या नेत्या मेधा पाटकर यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या अन्यायाबाबत कैफियत मांडली. या पार्श्वभूमीवर पाटकर यांनी प्रकल्पाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी दिली.प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता अरुणा प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली असा आक्षेप काही प्रकल्पग्रस्तांचा आहे. घळभरणी केल्यामुळे काही प्रकल्पग्रस्तांची घरे धरणाच्या पाण्यात बुडाली. त्यामुळे या सर्व प्रकारास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच प्रकल्पग्रस्तांना २३ नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी गेले सहा महिने प्रकल्पग्रस्त विविध पातळ्यांवर आंदोलन छेडत आहेत. परंतु, प्रशासकीय अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे.त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे, अजय नागप, सूर्यकांत नागप, राजेंद्र नागप, अशोक नागप, गोपीचंद शेलार, रामचंद्र नागप, सुचिता चव्हाण यांनी नर्मदा बचाव आंदोलन राष्ट्रीय समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची चेंबूर (मुंबई) येथे भेट घेतली.
यावेळी प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. त्यावेळी पाटकर यांनी अरुणा प्रकल्पाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले असून त्यानंतर आंदोलनाची दिशा निश्चित करू असे सांगितल्याची माहिती तानाजी कांबळे यांनी दिली आहे.