वैभववाडी : पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी दोन दिवसांपूर्वी प्रशासनाच्या निषेधार्थ ह्यमुंडणह्ण केल्यानंतर प्रकल्पस्थळी शुक्रवारी प्रातिनिधीक ह्यश्राद्धह्ण घालण्यात आले.
पुनर्वसन उपायुक्त अरुण अभंग यानी दोन आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते. त्यानंतर ८ नोव्हेंबरच्या आयुक्त कार्यालयावरील आंदोलनाची दखल घेऊन १० नोव्हेंबरला मुख्य अभियंता तिरमनवार यांनी अरुणा प्रकल्पाला भेट दिली. अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मुख्य अभियंता तिरुमनवार यांची त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली तेव्हा प्रकल्प अधिकारी यांनी दिलेली माहिती आणि प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे प्रकल्पग्रस्तांसमोर कबुल केले. त्या अनुषंगाने बुधवारी प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले होते.
परंतु, ही बैठक न घेता धरणाच्या कामासाठी पाण्याचा विसर्ग करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरु केल्यामुळे संतप्त अरुणा प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पस्थळी आपल्या बुडालेल्या घरांचा पुरावा नष्ट केला जाऊ नये म्हणून जागता पहारा शांततेच्या मार्गाने सुरु ठेवला होता. तसेच मिटींग न घेतल्याबद्दल प्रकल्पग्रस्तांनी मुंडण करुन आपला संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज प्रातिनिधीक श्राद्ध घातले. यावेळी तानाजी कांबळे, सुरेश नागप, प्रकाश सावंत उपस्थित होते. पोलिसांच्या सूचनेवरून प्रकल्पग्रस्तांनी चार दिवसांपासून प्रकल्पस्थळी सुरु केलेला पहारा बंद केला आहे.