सिंधुदुर्ग - राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली. कणकवलीमधील कनेडी गावातील बाजारपेठेत भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याने या वादाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन जमावासमोर गेलेल्या वैभव नाईक यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून आता कोणत्याही क्षणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते.
भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी, आता अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आणि कोकणवासीयांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या यात्रेमुळे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाई टाळली होती. मात्र, आता पोलीस यंत्रणा एक्शन मोडवर असून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना पोलीस कुठल्याही क्षण ताब्यात घेऊ शकतात, अशी चर्चा जिल्ह्यात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात झालेल्या राड्यामध्ये दोन्हीकडून लाठ्या काठ्या आणि काचेच्या बाटल्यांचाही एकमेकांवर मारा करण्यात आला. त्यात कुंभवडेचे माजी सरपंच आप्पा तावडे हे डोक्यावर लाकडी दांडा बसल्याने जखमी झाले. तर कुणाल सावंत आणि भाजपा कार्यकर्ते रुपेश सावंत हेही जखमी झाले होते. या घटनेनंतर कनेडी बाजारपेठेत तणावाचे वातावरण होते. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.
आंगणेवाडी यात्रेतील मेळाव्यावरुन टीका
आंगणेवाडीत भराडी मातेच्या यात्रेदिवशी भाजपाने आनंद मेळावा घेतला. तो फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठी आणि नारायण राणेंना राजकीय निरोप देण्यासाठी होता का? या मेळाव्यासाठी' सिंधुदुर्ग बदलतोय' ..अशी टॅग लाईन वापरण्यात आली. म्हणजे नेमके काय? जिल्ह्यात पुन्हा राडे सुरू झाले म्हणून सिंधुदुर्ग बदलतोय काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.