संदेश कोलतेसावंतवाडी : हिरवीगार गर्द वनराई, धुक्याची झालर अशा बेधुंद करणाऱ्या निसर्गाच्या साथीने सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणाऱ्या असनिये येथील कणेवाडी धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावले वळत आहेत. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हा धबधबा पूर्णपूणे प्रवाहित झाला आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्यापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक असले तरी साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची तसेच युवकांची या धबधब्यावर गर्दी होत असून निसर्ग सहलीसाठी या ठिकाणाची निवड होत आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असनिये गाव निसर्ग सौंदर्यासाठी व वन्यजीवांच्या वस्तीसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीचे डोंगर, गर्द हिरवेगार जंगल, माड, पोकळीची झाडे, नैसर्गिक जलस्त्रोत, दारूबंदी यासाठी असनिये गाव प्रसिद्ध आहे. या सर्वात असनिये गावच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेल्या कणेवाडी धबधब्यामुळे गेली काही वर्षे असनिये गाव प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.
असनियेहून घारपीचा प्रवास सुरू झाल्यावर कणेवाडी येथील घाटमार्गात समोर मनाला थक्क करणारा हिरव्यागार वनराईतून फेसाळत कोसळणारा धबधबा दृष्टीस पडतो. कोसळणारा पाऊस, धुक्याची झालर व दुसऱ्या बाजूने ताठ मानेने दौलत उभी असलेली सह्याद्रीची रांग सारे काही मनाला थक्क करून जाते. हा धबधबा सह्याद्री पर्वतरांगांच्या अवघड भागात असल्याने तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्याजवळ पोहोचणे आव्हानात्मक ठरते.गोवा, दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी तसेच आंबोली या शिवाय वर्षापर्यटनाची अन्य ठिकाणे शोधणारे पर्यटक या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत. गावातील धबधब्यावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने गावातील ग्रामस्थांच्या हाताला हंगामी रोजगार मिळाला आहे. गावातील महिला बचत गटाच्यावतीने तसेच इतर ग्रामस्थांनी पर्यटकांच्या सोयीसाठी जेवण व नाश्त्याचे स्टॉल उभारले असून ग्रामस्थांच्या हाताला यातून हंगामी रोजगार मिळाला आहे.धबधब्याकडे असे जाधबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी बांदामार्गे डेगवे-तांबोळी असा १३ किलोमीटरचा तर सावंतवाडी, ओटवणे तांबोळीमार्गे २२ किलोमीटरचा व दोडामार्ग तळकटमार्गे ३२ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. तेथून निमुळत्या पायवाटेने धबधब्याजवळ जाता येते. मात्र, हे सगळे अडथळे पार करून धबधब्याजवळ पोहोचल्यास पर्यटनाचा आनंद मिळतो. साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची पसंती या धबधब्याला मिळत आहे.