कणकवली : गणेशोत्सव जवळ आला असून आशा सेविकांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळालेले नाही. त्यांचे मानधन वाढीव भत्त्यासह त्वरित देण्याची कार्यवाही व्हावी. तसेच आशासेविकांना कायमस्वरुपी आरोग्य सेवेमध्ये सामावून घेण्याबाबत त्वरित शासन निर्णय व्हावा, अशी मागणी भाजपा आमदार नीतेश राणे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीच्या आजारामध्ये शासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना राबवित आहे. शासनाच्या योजना व मार्गदर्शक सूचनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत त्यांना बहुमोलाचे सहकार्य करण्याचे काम गावपातळीवरील आशा सेविका करीत आहेत.
कोरोना साथीच्या पूर्वीपासून सुद्धा आशा सेविका ग्रामपातळीवर त्वरित आरोग्य सेवा देण्यासाठी तत्परपणे कार्यरत असतात. गावातील वाडीवस्तींमध्ये विखुरलेल्या दुर्गम ग्रामीण भागात जिथे रस्त्याअभावी पुरूष मंडळींना फिरणे कठीण असते. अशा ठिकाणी जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी पायपीट करून राबणाऱ्या आशा सेविकांना अत्यंत कमी मानधन ते पण अनियमितपणे देऊन शासन त्यांना वेठबिगाराची वागणूक देत आहे.
आशा सेविकांच्या विविध मागण्या त्यांच्या संघटनांनी यापूर्वी अनेकवेळा मांडल्या आहेत. परंतु त्यावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्या मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्रव्दारे नीतेश राणे यांनी केली आहे.