कणकवली: जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना लोकसभा निवडणूक कामाचा भत्ता तत्काळ देण्यात यावा.अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा कॉ. प्रियांका तावडे व सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी दिली.पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका यांनी लोकसभा निवडणुकीत ७ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायं ६ वाजेपर्यंत आपापल्या भागातील मतदान केंद्रावर औषधाच्या किटसह उपस्थित राहून आरोग्यविषयक तातडीची सेवा पुरवलेली आहे. पण निवडणूक कामकाजाचा भत्ता जिल्ह्यातील सर्वच आशांना देण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर हा भत्ता पूर्ण देण्यात आला, तर काही ठिकाणी निम्मा किंवा निम्म्याहून कमी देण्यात आलेला आहे.बऱ्याच ठिकाणी भत्ता अजिबातच देण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडलेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी, शिपाई, स्वयंसेवक आदी सर्वांना नियमानुसार भत्ता देण्यात आला आहे. तसेच निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाने शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनामधील कामगार, कर्मचाऱ्यांना मताधिकार बजावण्यासाठी सुट्टी जाहीर केलेली होती. पण हेच कर्तव्य पार पाडलेल्या बऱ्याच आशा वर्कर्सना मोबदला मिळालेला नाही, ही नक्कीच आशांच्यावर अन्याय करणारी बाब आहे. ज्यांना पूर्ण भत्ता मिळाला नाही व ज्यांना अजिबातच भत्ता मिळाला नाही, अशा सर्व आशानी फोन द्वारे संघटनेकडे तक्रारी नोंद करून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रशासनाची ही कृती एकच व सारखेच काम केलेल्या आशा कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण करणारी व त्यांच्या मानसन्मानाला तडा देणारी आहे. ज्या आशांना निम्मा किंवा निम्म्यापेक्षा कमी भत्ता मिळाला व बऱ्याच आशांना पूर्ण भत्ताच मिळाला नाही, याविषयी आपण निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून त्यांना योग्य व सन्मानजनक भत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करवा.अशी मागणी करण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविकांना लोकसभा निवडणूक कामाचा भत्ता तत्काळ द्या, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनची मागणी
By सुधीर राणे | Published: May 09, 2024 1:09 PM