सावंतवाडी : अवेळी पडलेल्या पावसामुळे कोकणात सर्वत्र भातशेतीचे नुकसान झाले आहे. गुंठाभर जागेत भातशेती करायची झाली तर सातशे-आठशे रुपये खर्च येतो. पण शासन नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून बदल करण्याची मागणी करणार आहे. या संकटातून पुन्हा कोकण उभा करायचा आहे, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.मंत्री शेलार यांनी शनिवारी कोलगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देताना सरकार कसे सकारात्मक आहे हे पटवून दिले.यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर, दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष महेश सारंग, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, राजू राऊळ, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.मंत्री शेलार यांनी प्रथम कोलगाव येथील सरमळकर यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी भात पूर्णत: खाली पडले होते. तर काही कुजले होते. यावेळी शेतकरी सरमळकर यांनी आम्ही भाड्याने जागा घेऊन शेती करतो आणि अवेळी पावसामुळे आमचे पूर्ण नुकसान होते, अशी व्यथा मांडली. तोच मुद्दा मंत्री शेलार यांनी धरून शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगितले. कोकणाला पुन्हा उभे करण्याची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे स्पष्ट केले.आमदार नीतेश राणे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे आता तरी नुकसान भरपाई त्वरित मिळावी.
भरपाईला वेळ झाला तर शेतकरी अडचणीत येतो. जर कोण पंधरा हजार नुकसान भरपाई मिळेल असे सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. शेतकºयांनी आपणास काय वाटते ते सांगितले पाहिजे. तरच परिपूर्ण अहवाल शासनापर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.निष्कर्ष बदलण्याची विनंती करणारजर एखाद्या शेतकऱ्याला गुंठ्यामागे सातशे रुपये खर्च येत असेल आणि शासन त्यांना नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देत असेल तर शेतकऱ्यांना कसे परवडेल? असा सवाल करीत मी आजच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे सर्व निष्कर्ष बदलण्याची विनंती करणार आहे. कारण सरकार सकारात्मक आहे. मला मुख्यमंत्र्यांनी पाठवले असल्याने यावर तातडीने निर्णय होईल, असा विश्वासही मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.