कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना फक्त चिखलफेक करीत आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणे घेणे नसून त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मते मागण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी व लोकप्रतिनिधींना मतदारांनी याबाबत जाब विचारावा आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी .असे आवाहन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केले.
कणकवली येथील संपर्क कार्यालतात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, प्रसाद गावडे, गुरुदास गवंडे, सचिन तावडे, विनोद सांडव, गणेश वाईरकर, फास्कल रॉड्रिक्स आदी पदाधिकारी उपस्थित होते.
परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने चार बळी गेले आहेत. माकडतापाने डोके वर काढले आहे . त्याचे सोयरसुतक लोकप्रतिनिधींना नाही. जनतेच्या प्रश्नांबाबत कोणीही आवाज उठविताना दिसत नाही. जिल्ह्यातील दूरध्वनी व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा त्रास जनतेला होत आहे.
मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवलेल्या समस्यांविरोधात मनसेने जेवढ्या वेळा आवाज उठविला तेवढा कोणीही उठविलेला नाही. आजी -माजी लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे जनतेची मोठीच करमणूक होत आहे. याउलट मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन पुराव्यानिशी भाष्य करून जनतेचे डोळे उघडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जाहिराती फिक्या पडल्या आहेत. सत्ताधाऱ्यांची पूर्णतः पोलखोल ते करीत आहेत. त्यांच्या सभाना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मच्छिमारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. फक्त त्याबाबत घोषणा केल्या जातात. अमलबजावणी होत नाही. काही नेते म्हाडाची घरे देणार म्हणून सिंधुदुर्गात येऊन घोषणा करीत आहेत. मात्र, यापूर्वी देण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांची स्थिती काय आहे ? ते त्यांनी आधी पहावे.
पालकमंत्री दीपक केसरकर, सत्ताधारी खासदार ,आमदार यांनी अनेक फसव्या घोषणा केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी एक लाख सेटटॉप बॉक्स जिल्ह्यात वाटणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचे पुढे काय झाले? जिल्ह्यातील गावागावात इंटरनेट सेवा पोहचलेली नाही. मग डिजिटल इंडिया कसा होणार ? याचे उत्तर सत्ताधाऱ्यानी दिले पाहिजे. मात्र, ते तसे करणार नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांसह सत्ताधाऱ्यांना घरी बसविण्यासाठी मतदारांनी आता सज्ज व्हावे. असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.