वेंगुर्ले : मायनिंगमधील नुकसान, शिमगोत्सवात घोडे नाचविण्यास विरोध तसेच आपल्या वडिलांना व काकांना दिलेला त्रास या सर्व गोष्टींंच्या रागातूनच आपण रामचंद्र्र धुरी यांचा खून केल्याची कबुली शनिवारी यशवंत धुरी याने पोलिसांसमोर दिली. दरम्यान, वेंगुर्ले पोलिसांनी आरोपी यशवंत धुरी याला शनिवारी पंचांसमवेत घटनास्थळी नेल्यावर त्याने खुनाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले असल्याची माहिती वेंगुर्ले पोलिस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांनी दिली. गुरे चारण्यासाठी गेलेल्या मठ-धुरीवाडी येथील रामचंद्र्र नारायण धुरी (वय ७0) यांचा मृतदेह कावलेवाडी येथील क्षेत्रफळ तळीनजिकच्या शासकीय जंगल परिसरात आढळून आला होता. मृतदेहाच्या शरीरावर खरचटल्याच्या तसेच आजूबाजूच्या परिसरात झटापटीच्या खुणा आढळून आल्याने धुरी यांचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे होती. याबाबत संशयीत म्हणून सुदेश सूर्यकांत धुरी (वय ४७) व सुभाष उर्फ रामचंद्र्र गजानन धुरी (वय ५५) यांना पोलिसांनी २७ मार्च रोजी रात्री ताब्यात घेतले होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी यशवंत धुरी हा फरारी होता. बऱ्याच प्रयत्नांनी पोलिसांनी यशवंत धुरी याला मंगळवारी (२९ रोजी) कोलगाव येथे ताब्यात घेतले. यशवंत याची गेले दोन दिवस पोलिस कसून चौकशी करीत होते. अखेर आज यशवंत याने रामचंद्र धुरी यांचा खून केल्याची कबुली दिली. खुनाबाबत कबुली देताना यशवंत म्हणाला की, मठ येथे होऊ घातलेल्या सिलिका मायनिंग प्रकल्पामुळे आपल्याला फायदा होणार होता, पण रामचंद्र धुरी याने त्याला विरोध केल्याने माझे नुकसान झाले. तसेच गेल्या वर्षीपासून आपणाला शिमगोत्सवात रामचंद्र धुरी हे घोडे नाचविण्यास देत नसत. या प्रकारामुळे आमचे घर वाडीने वाळीत टाकले होते. कोणीही आमच्या घरी येत नसत. एवढेच नव्हे तर रामचंद्र्र धुरी यांनी आपल्या वडिलांना व काकांना बराच त्रास दिला होता. मारहाणही केली होती. रामचंद्र्र धुरी याने केलेल्या सर्व कृत्याचा राग मला होता. या रागातूनच आपण संधी साधून त्यांचा खून केला असे आरोपी यशवंत धुरी याने पोलिसांना सांगितले आहे. (प्रतिनिधी).
यशवंत धुरीकडून खुनाची कबुली
By admin | Published: April 03, 2016 3:50 AM