विधानसभा अध्यक्षांचे कोकणाशी अतूट नाते, सावंतवाडीत मूळ घर; वेळोवेळी येणे जाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 11:57 PM2022-07-03T23:57:33+5:302022-07-04T00:00:50+5:30
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेले राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले
सिंधुदुर्ग/ सावंतवाडी : आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सगळीकडून त्याचे जोरदार अभिनंदन होत असताना त्यात सिंधुदुर्ग जिल्हाही मागे नाही. नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून जरी आमदार झाले असले, तरी ते मूळचे सावंतवाडीतील असून त्यांचे येथील सालईवाडा येथे घरही आहे. त्यामुळे नार्वेकर यांचे सावंतवाडीशी असलेले अतूट नाते समोर आले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेले राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. पण, अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील सालईवाडा येथे त्यांचे घर आहे. त्यांचे आजोबा सावंतवाडीतच राहात होते. मात्र, कामानिमित्त ते मुंबईला गेल्यानंतर नार्वेकर कुटुंब तेथेच स्थायिक झाले. तरीही, त्यांची सावंतवाडीशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. सावंतवाडीतील सालईवाडा येथे त्यांचे घर आहे. ते घर बंद असले तरी घराच्या बाहेर राहूल नार्वेकर यांनी आपल्या नावाची पाटी लावली आहे. राहुल यांचे भाऊ मुंबई महापालिकेत नगरसेवक असून त्यांचाही उल्लेख या पाटीवर आहे. त्यामुळे नार्वेकर कुटुंबाची सावंतवाडीशी असलेलं नातं दिसून येतं.
दरम्यान, नार्वेकर कुटुंब कधीही सावंतवाडीत आले तरी येथील वेगवेगळ्या देवस्थानाना आवर्जून जातात. घोडेमुख देवस्थानावर तर त्यांची विशेष श्रध्दा असल्याचे सांगितले जाते. सावंतवाडी आले तरी ते कधीही त्याचा गाजावाजा न करता सुट्टी येथे घालवतात आणि निघून जातात असे सांगितले जाते. नार्वेकर कुटूंबाचा गणपती मुबंईला असतो, त्यामुळे गणपतीच्या उत्सवाला इकडे येत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. नार्वेकर यांचे जवळचे नातेवाईक नेवगी यांच्या कुटूंबाला विचारले असता नार्वेकर यांचे सालईवाडा येथे घर असून ते केव्हाही घरी येतात असे त्यांनी सांगितले.