कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली तालुक्यातील १५ गावांमध्ये झालेल्या भूसंपादनातील मालमत्तांचे मूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले आहे. भूमी अभिलेख, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, जीवन प्राधिकरण व महसूल विभागाच्या पथकांकडून १९ आॅगस्टपर्यंत ते पूर्ण करून त्याचा अहवाल २१ आॅगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.महामार्ग चौपदरीकरणांतर्गत ३ ए ची अधिसूचना भारत सरकारकडून प्रसिद्ध झालेली असून कलम ३ डी अधिसूचना प्रसिद्ध होऊन ३ जी ची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पुरवणी अधिसूचनेतील कणकवली तालुक्यातील १६ गावांपैकी कणकवली शहरातील मालमत्तांच्या मूल्यमापनाचा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला होता.
उर्वरित वागदे, ओसरगाव, असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नाग सावंतवाडी, नांदगाव, साळीस्ते, संभाजीनगर, तळेरे, उत्तर दक्षिण गावठण व वारगांव अशा १५ गावांतील भूसंपादनांतर्गत असलेल्या मालमत्तांचे मूल्यमापन करण्याचे आदेश कणकवली प्रांताधिकारी यांनी दिले होते. ८ आॅगस्ट रोजी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने हे मूल्यांकन सुरू आहे.