मालवण : अरबी समुद्रात घोंगवणारऱ्या वायू चक्री वादळाचा फटका मालवण किनारपट्टीला बसला आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचा जोर मंगळवारी अधिकच वाढला आहे.
समुद्रातही जोरदार लाटा उसळत असून किनारपट्टीवर धडकणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे मच्छिमार बांधव व किनारपट्टीवरील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. बंदर विभागाच्या वतीने धोक्याची सूचना देणारा तीन नंबरचा बावटा मालवण बंदरात लावण्यात आला आहे. तर मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी सर्वत्र कोसळत आहेत.दरम्यान, सायंकाळी उशिरा समुद्राच्या पाण्याची पातळीही अधिकच वाढली. त्यामुळे देवबाग, दांडी परिसरात समुद्राचे पाणी घुसले. देवबाग येथे ख्रिश्चनवाडी, श्रीकृष्णवाडी आणि मोबार येथे काही घरांना पाण्याने वेढा दिला. काही ठिकाणी समुद्राचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. आचरा गाऊडवाडी येथे पुलावरून पाणी वाहत होते.