दोडामार्ग : झरे २ या बुथवर एका मतदाराने एकाचवेळी सगळी बटणे दाबल्याने गोंधळ उडाला. मशीन बंद पडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. साधारण एक तास मतदार ताटकळत उभे राहिले. तासाभरानंतर मशीन दुरुस्त करण्यात आली आणि त्यानंतर मतदारांनी आपला हक्क बजावला. याच ठिकाणी सायंकाळी मतदारांची गर्दी उसळल्याने वेळेच्या मर्यादेनंतरही त्यांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.तालुक्यात लोकसभेसाठी झालेली मतदान प्रक्रिया शांततापूर्वक पार पडली. वातावरणातील उष्मा वाढला असताना देखील मतदारांनी रणरणत्या उन्हातून जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. कुंब्रल या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. दोन तासांसाठी ही मशीन बंद होती.दरम्यान, मशीन दुरुस्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र दोन तासांची खटाटोप करूनही त्यात यश न आल्याने अखेर ती मशीन सर्वांसमोर सील केली व त्याजागी दुसरी ईव्हीएम मशीन बसविण्यात आली. सकाळी चालू झालेल्या मतदान प्रक्रियेत वयोवृद्धांनी देखील मतदान केले. रखरखत्या उन्हामुळे दुपारच्या वेळेला मतदान केंद्रावरील गर्दी ओसरली होती; परंतु संध्याकाळच्या सत्रात मात्र मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
केसरकरांकडून आढावामतदान प्रक्रिया चालू असताना राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तालुक्याचा आढावा घेतला. शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल परब यांनी बुथवर जात आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.