गुहागर : विद्यार्थी व पालकांना वेठीस धरुन तसेच सदस्यांची फसवणूक करुन संचालक मंडळ गुहागर एज्युकेशन सोसायटीचे कामकाज करत आहेत. निवडून येण्यासाठी सभासदांनी दिलेला उद्देश संचालक मंडळ विसरले आहे, असा आरोप गुहागर एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष पद्माकर आरेकर व अन्य सभासदांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. गेली अनेक वर्षे संस्थेच्या इतिहासात निवडणूक झाली नव्हती. विद्यमान संचालक मंडळाने संस्थेवर निवडणूक लादली. निवडणुकीला खर्च झाला. हा मोठा खर्च करुन संचालक मंडळाने काम सुरु केले आहे. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली आहे. संस्था अनुदानित आहे. असे असताना आता विकास निधीसाठी संचालक मंडळ विद्यार्थी व पालकांना वेठीस का धरत आहे, असा सवाल आरेकर यांनी विचारला आहे. संस्थेच्या माजी पदाधिकारी किरण खरेंसह जयदेव मोरे, विनायक जाधव, नीलेश मोरे आदींनी संस्थेत झालेला गैरव्यवहार बाहेर काढण्यासाठी गेल्या काही महिन्यात माहितीच्या अधिकाराखाली सात अर्ज दिले असल्याची माहिती दिली. यामधून आलेली उत्तरे ही चुकीची व न जुळणारी आहेत. हे कागदपत्रासहीत दाखवले. यामध्ये संस्थेच्या ५० लाखांच्या स्थावर मालमत्तेसाठी नुकतेच खरेदी केलेले सिमेंट ब्लॉक व इतर साहित्य म्हणून दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात इमारत जागा अशा स्वरुपामध्ये स्थावर मालमत्ता असल्याचे पद्माकर आरेकर यांनी सांगितले. मैदान सपाटीकरणासाठी १ लाख ९६ हजार रुपये खर्च झाले असून, प्रत्यक्षात असे कुठल्याही मैदानाचे सपाटीकरण झालेले नाही, अशी माहिती देत या कामाचे बिल २ लाख रुपये नितीन भोसले यांच्या नावावर करण्यात आले. एकाच दिवशी शृंगारतळी येथील एकाच दुकानात २२०० सिमेंट ब्लॉकसाठी ९ रुपये दराने २२ हजार ५००, तर ३५ हजार सिमेंट ब्लॉकसाठी १० रुपये दराने ३ लाख ५५ हजार ५०० रुपये १० सप्टेंबर २०१३ रोजी देण्यात आले. जास्त ब्लॉक असताना चढ्या दराने एकाच दिवशी बिल आकारणी जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करुन घेतल्याचे दाखवण्यात आले. विद्यालयाच्या इमारतीसाठी कौल घालणे, पन्हळ लावणे आदी कामासाठी २१ नोव्हेंबर २०१३ ला मोठा खर्च चुकीच्या पद्धतीने मंजूरीसाठी दाखवला. यावेळी पद्माकर आरेकर, विनायक जाधव, नीलेश मोरे, समीर घाणेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुहागर एज्युकेशनवर हल्लाबोल
By admin | Published: June 07, 2015 12:47 AM