कणकवली - सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख, मजूर संस्था संचालक तथा करंजचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी त्याच दिवशी चार व नव्याने अटक केलेला एक, अशा ५ आरोपींना गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी नरडवे नाका तसेच न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कणकवली न्यायालयात गुरुवारी दुपारी ३.३० वाजता संबधित गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. ४ वाजण्याच्या सुमारास न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता सरकारी पक्षातर्फे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. संबधित आरोपी सराईत आहेत. तसेच या गुन्ह्यात अन्यही काही आरोपींचा हात आहे.
तपासात निष्पन्न झालेल्या अन्य दोन आरोपींना अटक करायची आहे. त्यामुळे पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती. यावर आरोपींच्यावतीने वकिलांनी, तपास करण्यासाठी यापूर्वी ५ दिवसांची कोठडी दिली होती. त्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडीत वाढ करु नये, असे म्हणणे मांडले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कणकवली न्यायालयाने पाचही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना २५ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कणकवली दिवाणी न्यायालयात गुरुवारी या संशयित आरोपींना हजर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कणकवलीमध्ये दंगल नियंत्रण पथक व आर. सी. पी. पथक कणकवली दिवाणी न्यायालयालगत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरच तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, पोलिसांनी अजूनही आरोपींची नावे उघड केलेली नाहीत. त्यांची ओळख लपविली जात आहे.प्रसिद्धिमाध्यमानाही माहिती दिली जात नसल्याने या गुन्हयामागचे गूढ आणखीन वाढतच आहे. संतोष परब यांना कोल्हापूर येथील रुग्णालयातून गुरुवारी डिस्चार्ज मिळाल्याने त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात अधिक चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी त्यांच्याकडून अधिक माहीती जाणून घेतली.