कणकवली: गेले पन्नास दिवस एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या अंगावर आज, शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कणकवली बस स्थानक परीसरात सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांच्या गाडीवरील चालकाने शिवीगाळ करत चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संपकरी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या घटनेमुळे कणकवली बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केलेल्या त्या चालकाने कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा, आम्ही पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करणार असल्याचा पवित्रा या संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तसेच संबधित घटनेचा निषेधही करण्यात आला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी एसटी कर्मचारी गणेश शिरकर, बालाजी गुट्टे, बालाजी मुंडे, मुळये, नेरकर, पवार, मोरे, सामंत, प्रकाश वालावलकर, परब,केंद्रे, माने, मसुरकर, दळवी, हांडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
ST Strike : कणकवलीत संपकरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 12:41 PM