चिपळूण : तालुक्यातील कात्रोळी कुंभारवाडी येथील कृष्णा दिनू निवळकर (वय ५५) यांनी थकीत वीज बिल माफ करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. विष प्राशन केल्यानंतर निवळकर यांना प्रथम कामथे उपजिल्हा रुग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.‘महावितरण’च्या चिपळूण येथील कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता कात्रोळी कुंभारवाडी येथील कृष्णा निवळकर हे वीज ग्राहक कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या कार्यालयात आपल्या थकीत बिलाची रक्कम कमी करण्यासाठी आले होते. निवळकर यांच्याकडे सप्टेंबर २००८ ते मे २००९ दरम्यान, ३७,१५७ रुपयांची वीज बिलाची थकबाकी होती. त्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी जोडणी घेतली होती. थकबाकी न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा दि. १३ एप्रिल २०१० मध्ये खंडित केला होता. त्यानंतर त्यांनी विविध राजकीय नेत्यांकडे धाव घेतली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या घरी दुसरे मीटर बसवून वीज वापराची तपासणी केली असता वीज मीटर योग्य असल्याचे निदर्शनास आले होते. निवळकर हे घरघंटीसाठी थ्री फेजचा वापर करीत होते. बिलात सवलत मिळत नसल्याने शेवटी २०१० मध्ये त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून ‘महावितरण’ची कारवाई योग्य असल्याचा निर्णय दिला. शिवाय थकबाकी जमा केल्याखेरीज वीजपुरवठा सुरू करू नये, असा निर्णय १७ जानेवारी २०१२ रोजी दिला. या निर्णयानंतरही निवळकर यांनी कार्यकारी अभियंता आवळेकर यांची भेट घेतली व बिलात सवलत देण्याची मागणी केली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुन्हा त्यांनी कार्यकारी अभियंता आवळेकर यांची भेट घेऊन बिलात सवलतीची मागणी केली. त्यावेळी बिल कमी करता येत नाही. थकीत बिलावरील व्याज कमी करण्याचा प्रयत्न करू. मात्र, मुद्दल भरलीच पाहिजे. शिवाय अधूनमधून वीज बिल कमी करण्याबाबत शासनाच्या ज्या योजना येतील, त्याचाही लाभ तुम्हाला दिला जाईल, असे आवळेकर यांनी सांगितले. त्यानंतर अचानक त्यांच्यासमोर निवळकर यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. कार्यकारी अभियंता आवळेकर यांनी ‘बिल माफ करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. त्यांचा वीज मीटर सुस्थितीत होता. त्यांनी विजेचा वापर केला होता. टप्प्याटप्प्याने त्यांनी बिलाची रक्कम भरली असती तर आतापर्यंत मुद्दल जमा झाली असती. पुढील काळात शासकीय योजनेतून व्याज माफीही मिळाली असती. या सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या होत्या. त्यांच्या सर्व तक्रारींची वेळोवेळी दखल घेतली होती. २००८ मध्ये ८२० रुपये व मे २००९ मध्ये तीन हजार रुपये बिल त्यांनी भरले होते. त्यानंतर कोणतीही रक्कम भरली नाही. ते असे कृत्य करतील, असे अजिबात वाटले नव्हते,’ असे कार्यकारी अभियंता आवळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चिपळुणात वीज ग्राहकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: November 06, 2015 11:26 PM