चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकार पाच वर्षे स्थिर असेल. काही असंतुष्ट मंडळी युतीमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, त्याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही. हे सरकार पाच वर्षे स्थिर कारभार करेल, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. चिपळूण येथील यादव चॅरिटी ट्रस्टच्या सभागृहात शुक्रवारी कापसाळ पंचायत समिती गणातील शिवसैनिकांचा मेळावा झाला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते उपस्थित होते. ते म्हणाले, आघाडी सरकारमध्ये ज्यांनी घोटाळे केले, त्यांना चौकशीसाठी सामोरे जावेच लागेल. केंद्रात व राज्यात स्वच्छ प्रतिभेचे सरकार आहे. या सत्तेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळाला पाहिजे. जनतेला सरकारबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. या सरकारच्या विकासाचा धडाका पाहून अनेक कार्यकर्ते विविध पक्षांचा त्याग करुन शिवसेनेकडे येत आहेत. शिवसेनेला आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत खऱ्या अर्थाने राजकीय कसोटी लागेल. म्हणून आतापासूनच शिवसैनिकांनी झोकून देऊन काम करा. आगामी काळात सर्वच ठिकाणी भगवा फडकवण्याचा निर्धार करा. भौतिक विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. उद्योगाला पूरक सुविधा येथे उपलब्ध करण्यावर आपला भर आहे. महामार्गाचे चौपदरीकरण, चिपळूण - कऱ्हाड रेल्वेमार्ग, सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, रोहा-इंदापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ, रोहा ते दिघी पोर्ट, जयगड ते डिंगणी या रेल्वे मार्गालाही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात कोकणच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, राकेश शिंदे, सुधीर शिंदे, स्वप्नील शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)
असंतुष्ट मंडळींकडून भांडणे लावण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 12, 2016 10:36 PM