कणकवली : तालुक्यातील तळेरे पूलाखाली एका प्राचीन काळातील मूर्तीची विक्री करण्याचा व्यवहार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हाणून पाडला आहे. संबंधिताकडून ती मूर्ती ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. तसेच ती मूर्ती प्राचीन काळातीलच आहे का ? याबाबतची शास्त्रशुद्ध तपासणी करण्यासाठी ती मूर्ती रत्नागिरी येथे पुरातत्व विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात आली आहे.ज्याच्याकडे मूर्ती सापडली त्याने ती मूर्ती आपणास घरात खोदाई करताना काही वर्षांपूर्वी सापडल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, प्राचीन काळातील वस्तूंच्या विक्री व खरेदीबाबतच्या कायद्यानुसार त्या मूर्ती बेकायदेशीररित्या कोणी विकत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पुढील तपासासाठी संबंधीत प्रकरण कणकवली पोलिसांकडे वर्ग केले आहे. कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक शरद देठे याप्रकरणी तपास करत आहेत.याप्रकरणी आणखी काहीजणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी एकास चौकशीअंती नोटीस देऊन सोडल्याचे पोलिस उपनिरीक्षक देठे यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची चर्चा कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असून एकच खळबळ उडाली आहे.
तळेरे येथे प्राचीन काळातील मूर्तीची विक्री करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी एकास घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:26 PM