कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतीत इयत्ता तिसरी ते सहावी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या ६ मुलांचे दोन अनोळखी व्यक्तींकडून चारचाकी गाडीतून अपहरण करण्याची घटना घडली आहे. मात्र, त्या मुलांनी प्रसंगावधान दाखवत त्या दोन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. ही घटना काल, सोमवारी (दि.१३) घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन अज्ञात अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा चौफेर तपास करण्यात येत आहे. सावडाव येथील पाचवी व सहावीत शिकत असणाऱ्या ५ मुली व तिसरीत शिकणारा १ मुलगा एका वाडीतील एका घरातील कुमारिका ओवाळणीचा कार्यक्रम आटपून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डगरेवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये जात होते. दरम्यान, एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी मधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.मात्र, मुलांनी चालक व त्याचा अन्य एक सोबती हे फोनवर बोलत असल्याची संधी साधली. तसेच त्या वेळात गाडीतून मुलांनी पळ काढला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.कुमारिका ओवाळणीच्या कार्यक्रमासाठी काही शाळकरी मुले सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गेली होती.त्यापैकी काही मुले आपल्या घरी निघून गेली.त्यानंतर ५ मुली आणि एक मुलगा जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत नेहमीप्रमाणे निघाली होती. साधारणतः ५०० मीटर अंतरावर ती चालत पोहचली असतानाच एक पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी तिथे आली. त्यातून दोघेजण खाली उतरले. तसेच त्या शाळकरी मुलांना चाकूचा धाक दाखवत त्यांनी गाडीत कोंबले. त्या ठिकाणी चारचाकीमधील एका व्यक्तीने विद्यार्थांच्या चेहऱ्यावर लाल कुंकू लावले.आणि सुसाट वेगाने जँगलमय भागात काही अंतरावर गेल्यावर पाच मुलांची दप्तरे तेथील ओहोळात टाकली. एक दप्तर मुलांजवळच राहिले.प्राथमिक शाळा नं. १ पार करून चारचाकी पुढे गेली. ही चारचाकी धनगरवाडीकडे जात होती.तेवढ्यात त्या अपहरण करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुले तो चारचाकी मधून खाली उतरून बोलायला लागला. त्या पाठोपाठ दुसरी व्यक्ती देखील खाली उतरली. ती संधी साधत त्या शाळकरी मुलांनी चारचाकीचा दरवाजा उघडुन खाली उतरत रस्त्याच्या उलट्या दिशेने धावत पळ काढला. यावेळी तेथीलच एका शाळेतील शिक्षक अशोक साळुंखे- देशमुख व इतरांना मुले पळताना दिसली. त्यांनी त्या मुलांना गाठले. तसेच पळण्याचे कारण विचारले.त्यानंतर सर्व मुलांनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न कसा झाला? याबाबत त्यांना माहिती कथन केली.एका मुलीच्या डोक्यावर नखाणी ओरबाडल्याच्या खुणाही दिसून येत होत्या. त्यामुळे ताबडतोब सर्व पालकांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना फोनवर संबधित घटनेची माहिती शिक्षकांनी कळवली.काही वेळातच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले. यावेळी सरपंच आर्या वारंग, उपसरपंच दत्तात्रय काटे, संजय झगडे, चंद्रकांत तेली, परशुराम झगडे, पोलीस पाटील अंकुश वारंग, पालक संतोष गावकर,कुमार कामतेकर, संतोष जठार, राजेंद्र वारंग, प्रदीप गावकर, संतोष मोरे, चंद्रकांत मेस्त्री, महेश पुजारे, संतोष तेली, तुकाराम तेली, मंगेश मेस्त्री, विद्याधर वारंग, साईनाथ डगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.कणकवली पोलिसांनाही घटनेबाबत कळवण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी कणकवली पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अनिल जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक रामचंद्र शेळके, कणकवली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगाडे, हवालदार मिलिंद देसाई आदींचे पथक दाखल झाले. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, अज्ञात अपहरणकर्त्यांचा सुगावा लागू शकला नाही.त्या अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यापूर्वी या घटनेसारख्या अन्य साम्य असलेल्या घटना पाहून तपासाचा प्रयत्न करीत आहेत.
शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल; सिंधुदुर्गातील सावडावमध्ये उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 12:37 PM