सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील गुन्ह्यांचे प्रमाण हे राज्याच्या तुलनेत खूप कमी आहे ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. तरीसुद्धा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणार आहे. घडलेले गुन्हे उघडकीस यावेत या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकारांना दिली.बुधवारी पोलीस अधीक्षक दालनात जिल्हा मुख्यालय पत्रकारांनी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असता ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले की, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमत: गुन्ह्याचे प्रमाण पाहिले. तर असे निदर्शनास आले की, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात गुन्ह्यांचे प्रमाण हे नगण्य आहे. ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. तरीसुद्धा इतर जे गुन्हे घडतात ते रोखणेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल. घडलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा यासाठी त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच पोलीस दलाचे मनोबल वाढविले जाईल व पोलिसांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला असून त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पावले उचलताना स्थानिक लोकांचे व मच्छिमार बांधवांचे सहकार्य हे पोलिसांना आवश्यक आहे. यांचे सहकार्य लाभल्यास सागरी सुरक्षा दलाला चांगली श्रेणी गाठता येईल असेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्याच्या विविध भागात यशस्वी कामशिंदे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे आहे. एम. एस्सी. कृषी, एल. एल. बी. तसेच सहकार क्षेत्रातील जी.डी.सी. अँड ए. हा डिप्लोमा हे शिक्षण पूर्ण करून सन १९६६ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. गडचिरोली, गोंदिया या नक्षलवादी भागात त्यांनी काम केले. या जिल्ह्यात सलग तीन वर्षे कठीण सेवा बजावल्याबद्दल शासनाकडून विशेष सेवा पदकही मिळाले. सोलापूर जिल्ह्यातही त्यांनी काम केले. एसीपी क्राईम व डी. व्ही. दोन याठिकाणी काम केले. २००२ च्या सोलापूरमधील जातीय दंगलीत ‘त्या’ दंगली शमविण्यासाठी कठोर कारवाईही केली. त्यानंतर नवी मुंबईत एसीपी क्राईम व एसीपी म्हणून स्पेशल ब्रँचमध्ये काम केले. घनसोली येथे झालेल्या जातीय दंगलीत चांगले काम केले. यावेळी वेळप्रसंगी गोळीबारही करावा लागला होता. सन २००६ मध्ये मुंबई शहर उपायुक्त म्हणून प्रमोशन मिळाले. मुंबई उपनगर अधीक्षक म्हणूनही काम पाहिले. सन २००९ ते २०१२ पर्यंत डी.सी.पी. म्हणून काम पाहिले. सध्या दहशतवादी विरोधी पथकाचे अधीक्षक पदावर असताना सिंधुदुर्गात बदली झाली.
गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न
By admin | Published: May 20, 2015 10:23 PM