राम मगदूम
गडहिंग्लज : आठवडाभरात आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालकांच्या ताब्यात येईल.त्यामुळे त्यांनी आपसातील मतभेद आणि अंतर्गत गटबाजीला मुठमाती देऊन कारखान्याच्या भवितव्यासाठी एकत्र यावे, हीच ऊसकरी शेतकरी, सभासद व कामगारांची अपेक्षा आहे.म्हणूनच आता संचालकांच्या भूमिकेकडेच सर्वांचे लक्ष आहे.१० एप्रिलपर्यंत कारखान्याचा ताबा संचालकांकडे देण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे ब्रिस्क कंपनी जाणार आणि कारखाना संचालकांच्या ताब्यात येणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कारखाना सुरळीत चालू ठेवण्यासंदर्भात संचालक कोणती भूमिका घेणार ? त्यावरच येत्या गळीत हंगामात कारखान्याचे चाक फिरणार की नाही ? हे अवलंबून आहे.गडहिंग्लज विभागातील 'दौलत' आणि आजऱ्याची परिस्थिती विचारात घेता आपला कारखाना यापुढे सुरळीत चालू ठेवण्याचे खरे आव्हान विद्यमान संचालकांच्यासमोर आहे. त्यामुळे कारखाना स्व:बळावर चालविण्यासाठी किंवा चालवायला देण्याच्या निर्णयासाठी त्यांच्यात 'एकमत' होण्याची गरज आहे. तथापि,मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने आलेल्या ह्यब्रिस्कह्णने कालबाह्य मशिनरी आणि पोषक वातावरणाच्या अभावाचे कारण पुढे करून मुदतीपूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील कुपेकर व मुश्रीफ समर्थक संचालक काय करणार ? हे पहावे लागेल.पूर्वइतिहास विचारात घेता कारखान्यात विद्यमान अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे व माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांचे कधीच जमलेले नाही.त्यामुळे शिंदेंच्या भूमिकेला विरोधी आघाडीतील शहापूरकर गटाचा पाठिंबा मिळेल,असे सध्यातरी दिसत नाही. याऊलट,'ब्रिस्क'कडे कारखाना चालवायला देण्यासाठी सहकार्य केलेल्या तत्कालीन १५ संचालकांना गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे दुखावलेले विरोधी आघाडीचे प्रमुख माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण हे आता विद्यमान अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांच्या विचारांशी 'सहमत' झाल्याची चर्चा आहे.३० मार्च, २०२१ रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली आहे. परंतु, कोरोनामुळे जूनपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे कारखान्याच्या भवितव्याचा निर्णय विद्यमान संचालकांनाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी एकजुटीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे.किंबहुना,त्यावरच कारखान्याचे भवितव्य अवलंबून आहे.
- कारखान्यातील बलाबल असे : सत्ताधारी आघाडी-१० (कुपेकर-मुश्रीफ ५, शिंदे-३, नलवडे-२)
- विरोधी आघाडी :८ (प्रकाश चव्हाण गट -५, शहापूरकर गट -३)