कणकवली : अलीकडे मराठी चित्रपटांचे सादरीकरण वेगळ्या अंगाने होत आहे. मराठी चित्रपटाने कात टाकली असून, प्रेक्षकांचीही चव बदलली आहे. मराठी चित्रपटाच्या नव्या बदलांना प्रेक्षकांनी स्वीकारले आहे, असे मत सिनेअभिनेत्री सई ताह्मणकर हिने व्यक्त केले. बाजारपेठ मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहण्यासाठी कणकवलीत आलेल्या सईने पत्रकारांशी संवाद साधला. नुकत्याच झळकलेल्या ‘क्लासमेटस्’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभत असल्याचे सईने सांगितले. ‘दुनियादारी’ची छाप या चित्रपटावर नसून ती एक मर्डर मिस्ट्री आहे. कॉमेडी, अॅक्शन आदी मालमसाला असलेले संपूर्ण पॅकेजच या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मिळेल.दुनियादारीची स्टारकास्ट, कॉलेजचा बॅकड्रॉप आदी गोष्टींमुळे त्या चित्रपटाचा फिल येतो असे म्हटले जात असले, तरी ‘क्लासमेटस’्ची पटकथा पूर्णत: वेगळी असल्याचे सईने सांगितले. मराठी कलाकार नव्या बदलांना सामोरे जात आहेत आणि ते त्यादृष्टीने सजग झाले आहेत. आपल्या दिसण्यावर, फिटनेसवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मराठी चित्रपट सादर करण्याची पद्धतही बदलली आहे. बॉक्स आॅफिसवर चांगले यश मिळत असल्याने निर्मात्यांना चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे चित्रपटांच्या मार्केटिंगवर निर्माते विशेष लक्ष देत आहेत. मराठीतील बोल्ड अभिनेत्री असा छाप मारण्यात येत असला तरी आतापर्यंत अनेक चित्रपटांतून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका वठवल्याचे सईने सांगितले. बोल्ड कलाकार म्हणून प्रेक्षकांनीही आपणास चांगल्याप्रकारे स्वीकारले आहे. आधी प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्या पडत असल्या तरी नंतर हसूही उमटते. चित्रपट हा आमचा पेशा आहे. चित्रपटाच्या मागणीप्रमाणे आणि नव्या बदलांना सामोरे जावे लागत आहे. सोपे नसले तरी गुणवत्ता असलेल्या मराठी मुलींंना चित्रपट क्षेत्रात शंभर टक्के संधी आहे. मात्र, त्यांनी भावनिक त्याग करण्याची तयारी ठेवावी आणि आपल्या गुणवत्तेवरच या क्षेत्रात शिरकाव करावा. बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या तुलनेत विचार करताना आपण फारच आळशी आहोत, असे सई म्हणाली. मराठी चित्रपट प्रयोगशील होत असला तरी आम्हाला अजून खूप काम केले पाहिजे. चित्रपटांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलताना एक सोशल फिगर म्हणून वावरताना सामाजिक परिणामांचा आज विचार करावा लागतो, असेही सईने सांगितले. (प्रतिनिधी)अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘हंटर’ या आगामी हिंदी चित्रपटातून सई प्रेक्षकांसमोर येत असून, २० मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. खूप झोपणे आणि मासे खाण्याची आवड असल्याचे सांगतानाच अॅक्शनपट आणि ऐतिहासिक चित्रपट करायची इच्छा असल्याचे सई म्हणाली. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सिंधुदुर्गात एप्रिल-मे महिन्यात येणार असल्याचे सांगतानाच लहानपणी कोकणात अनेकदा फिरणे झाले. कोकणात फिरताना रस्त्याशेजारील छोट्या हॉटेल्समधून खायला खूप आवडते. येथील निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्याची गरज असल्याचे मत सईने व्यक्त केले.
नव्या बदलांना प्रेक्षकांनी स्वीकारले
By admin | Published: January 19, 2015 9:22 PM