सिंधुदुर्ग : पर्यटन हंगाम सुरू असतानाच मालवणमधील तारकर्ली येथे काल, मंगळवारी मोठी दुर्घटना घडली होती. २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघां जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी बोट मालकासह सात जणांवर मृत्यूचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सातही जणांना तत्काळ अटकही करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पर्यटक लैलेश प्रदीप परब (वय ३६, रा.अणाव-कुडाळ) यांनी दिली आहे.या घटने प्रकरणी बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (५०, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (२३, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (३२, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (३१, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडकर (३९, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (५४, रा. देवबाग) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नरळे हे करीत आहेत. तारकर्लीच्या समुद्रात काल मंगळवारी स्कुबाडायव्हिंग बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत काल, मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे.तारकर्ली समुद्रात बोट उलटून घडलेल्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. काल, सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
तारकर्ली बोट दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल, मृत्यूचा ठपका ठेवत सात जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:40 PM