मालवण : होळी व रंगपंचमीच्यावेळी अनेक गैरप्रकार घडतात. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई करावी. तसेच या काळात महिलांना सुरक्षेसाठी सहकार्य करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक व तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.हिंदू जनजागृती समितीच्या मालवणच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी व तहसीलदार यांना निवेदन देऊन होळी व रंगपंचमीच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांबाबत लक्ष वेधले. होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. दुर्दैवाने या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी अनेक हिडीस प्रकार घडताना दिसून येतात. यासह अंमली पदार्थांचे सेवन, रेव्हपार्ट्या यांसारखे भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारे प्रसंग घडू लागले आहेत.रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुग मारणे, अंडी फेकून मारणे आदी प्रकार वाढत चालले आहेत. या भयग्रस्त वातावरणामुळे अनेक नागरिक, स्त्रिया आणि मुली यांना घराबाहेर पडणे अशक्य होत आहे.
परिणामी सामाजिक ताणतणाव आणि महिलांवरील अत्याचार यात वाढ होत आहे. महिलांची सुरक्षितता आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य या दृष्टीने या घटना गंभीर आहेत. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी गैरप्रकार करणाºयांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवून कठोर कारवाई करण्यात यावी.पोलिसांची गस्ती पथके वाढवावीत, प्रबोधनपत्र हस्तपत्रके वाटावी, जनजागृती करणाच्या चळवळी राबवाव्यात अशा प्रकारची मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली व गैरप्रकार टाळण्याच्या मोहिमेसाठी ही समिती सहकार्यही करेल, असेही हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे.