ओरोस : अविज पब्लिकेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत सहकार क्षेत्रात देशपातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दिला जाणारा बँको ब्ल्यू रिबन २०२० पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जाहीर झाला आहे. सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार बँकेला मिळाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत दिली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मिळालेल्या पुरस्काराची माहिती देण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक व्हिक्टर डान्टस, निता राणे, बँकेचे सीईओ अनिरुद्ध देसाई, आदी उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, अविज पब्लिकेशन, कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर एक मार्गदर्शक संस्था म्हणून १९९९ पासून कामकाज करीत असून, या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांची कामकाज पद्धती, सहकार क्षेत्रातील कायदे कानून व त्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञान याबाबतची अद्ययावत माहिती संकलन व प्रसिद्धीचे कामकाज केले जाते.
या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या विविध प्रकारच्या बँकिंग कामकाज करणाऱ्या संस्थांसाठी पुरस्कार प्रदान केले जातात. बँकेने आर्थिक मापदंडाचे उत्कृष्टरित्या पालन केल्याने त्याचप्रमाणे स्वमालकीचे डाटा सेंटर उभारून सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना बँकिंग क्षेत्रातील विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गटातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला बँको ब्ल्यू रिबन २०२० पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा मार्च २०२१ मध्ये म्हैसूर कर्नाटक येथे होणार आहे, असेही सावंत म्हणाले.बँकेचे कामकाज अव्वल ठेवण्याचा प्रयत्नया पुरस्काराबद्दल सतीश सावंत यांनी समाधान व्यक्त केले असून, या पुरस्काराचे श्रेय त्यांनी बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व ग्राहक यांना दिलेले आहे. तसेच भविष्यात जिल्हा बँकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या सेवा-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देऊन बँकेच्या आपली माणसं आपली बँक या ब्रीद वाक्याप्रमाणे बँकेचे कामकाज यापुढेही सातत्याने चालू राहील, अशी ग्वाही सतीश सावंत यांनी दिली.