कणकवली : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक होत असते. त्याकरता ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. तसेच ग्राहक प्रबोधनात कार्यशाळेचे महत्वपूर्ण योगदान आहे. असे प्रतिपादन कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले.ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या एक दिवसीय कोकण विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा कणकवली येथील महाराजा सभागृहात आज, गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड होते.यावेळी वैशाली राजमाने म्हणाल्या, सर्वसामान्य ग्राहक अन्याय होत असताना तक्रार करून काय होणार ? अशी मानसिकता बाळगतो आणि याकरीता प्रबोधन होणे तसेच ग्राहकाला सजग करणे हे कार्य या कार्यशाळेच्या माध्यमातून होणार आहे. फक्त ग्राहकाने सक्षमता दाखवीत मानसिकता बदलली तर निकोप समाजाभिमुख ग्राहक चळवळीला बळ मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या ग्राहक प्रबोधन कार्यशाळेमध्ये राज्याचे सचिव अरुण वाघमारे, वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य संघटक सर्जेराव जाधव तसेच जिल्हा ग्राहक मंचचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल आणि कोकण विभागाचे अध्यक्ष प्रा.एस .एन. पाटील यांनी ग्राहक संबंधी विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तहसीलदार रमेश पवार, ग्राहक पंचायतचे राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, ग्राहक मंच सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल, कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा संघटक दादा कुडतरकर, कणकवली तालुकाध्यक्ष नामदेव जाधव, सचिव महानंद चव्हाण, श्रद्धा कदम, अशोक करंबेळकर, प्रसिद्धी माध्यम समन्वयक विजय गावकर, रवींद्र मुसळे, डॉ. विठ्ठल गाड आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रबोधन गरजेचे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 3:46 PM