- अनंत जाधवसावंतवाडी : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने उभारण्यात येत असलेला आयुर्वेद प्रकल्प लातूनला होणार कि सिंधुदुर्गात यावरून महाविकास आघाडीतच रणकंदन माजले असतानाच आता यात सिंधुदुर्गने बाजी मारली असून, हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हयातील आडाळी येथेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाला अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे हा प्रस्तावित प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने तत्कालीन भाजप सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग आडाळी येथील ५० एकर जागेत आयुर्वेदिक प्रकल्प उभारण्याचे निश्चीत केले होते. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारशी पत्रव्यवहार करून ती आडाळीतील जागाही निश्चीत केली होती. आयुष मंत्रालयाचे एक पथक आडाळी येथे आले होते. त्यांना ही जागाही आवडली होती. मात्र नंतर भाजपचे सरकार गेले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले आणि आडाळीतील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सरकारने ही जागा केंद्राला हस्तातंरित करण्यासाठी बराच कालावधी घालवलात्यातच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांंनी हा प्रकल्प लातूर येथे हलविण्याचा घाट घातला होता. त्याला भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांनी विरोधही केला. खासदार विनायक राऊत यांनी तर मंत्री देशमुख यांच्यावर टिकाही करत प्रकल्प पळवत असल्याचा आरोप केला होता. मात्र नंतर यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मध्यस्थी केली. तसेच मंत्री देशमुख यांनीही एक पाऊल मागे घेतले तर केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही हा प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये झाला तरच राज्याला देऊ अन्यथा देणार नाही, अशी भुमिका घेतल्याने मंत्री देशमुख यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता.
या सगळ्या घडामोडीत महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसचे संबध काहिसे ताणलेही होते. मात्र आता यावर मार्ग निघाला असून, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आडाळी येथील एमआयडीसीच्या जागेत प्रकल्प करण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता आयुर्वेद प्रकल्प होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही जागा गोव्यापासूनही हाकेच्या अंतरावर असल्याने तसेच मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती असल्याने या प्रकल्पासाठी आयुष मंत्रालयाने सिंधुदुर्गला पसंती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी आडाळीत प्रकल्प करण्यास मंजूरी दिली : उदय सामंतदोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे आयुर्वेद प्रकल्प होणार असून, त्या प्रकल्पासाठी जागाही देण्यात आली आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. लवकरच अधिकृत कामाला सुरूवात होणार आहे.