सावंतवाडी : विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या राजकीय चर्चेनंतर सावंतवाडीच्या राजकारणाला नाट्यमय वळण लागले असून शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून बबन साळगावकर यांना पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्री केसरकर यांनी एक तास साळगावकरांची मनधरणी करून त्यांना शिवसेनेकडूनच निवडणूक लढवावी असा जोरदार आग्रह धरला. त्याला साळगावकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहीती पुढे आली आहे. विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर कोणत्या पक्षात जाणार? काय निर्णय घेणार? याची उत्सुकता शहरवासीयांबरोबरच जिल्हावासीयांना लागून राहिली आहे. मात्र, साळगावकर यांनी अद्यापही आपला निर्णय झाला नाही, असे सांगत निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीचे अंतिम दोन दिवस राहिल्याने साळगावकरांनी कोणता तरी निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी शहरवासीयांतून होत होती. त्यातच मंगळवारी रात्री उशिरा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी साळगावकर यांच्याबरोबर गवळी तिठा येथील कार्यालयात बैठक घेतली. ही बैठक एक तास चालली. त्यानंतर पालकमंत्री केसरकर आणि नगराध्यक्ष साळगावकर हे हसतमुखाने बाहेर आले. पालकमंत्री केसरकर यांनी साळगावकर यांची मनधरणी केली. आपण नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल करावा. आपल्यावर शहरवासीयांचा विश्वास आहे. यापुढेही नगर परिषद कारभार आपल्या हातातूनच व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, नगराध्यक्ष साळगावकर यांनी मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. लवकरच निर्णय घेईन. तो निर्णय शहरवासीयांच्या हिताचाच असेल असे सांगितले. तसेच शिवसेनेतूनच नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत मंत्री केसरकर यांना अप्रत्यक्ष दिल्याचे समजते. (वार्ताहर) चौकट योग्य तो निर्णय घेणार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत बबन साळगावकर यांना विचारले असता, लवकरच मी योग्य तो निर्णय घेईन. तसेच शहरवासीयांसाठी तो अपेक्षित निर्णय असेल असे त्यांनी सांगितले. मात्र, मंत्री केसरकर यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला.
बबन साळगावकर शिवसेनेच्या वाटेवर?
By admin | Published: October 26, 2016 11:08 PM