- महेश सरनाईक
राजकारणात कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र कधी होईल हे सांगता येत नाही. सावंतवाडीचे आमदार होताना दीपक केसरकर यांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे कट्टर समर्थक नगराध्यक्ष बबन साळगावकर आता तीच भूमिका घेत असतील तर त्याला चुकीचे कसे ठरवायचे. नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी करताना विधानसभेच्या सभागृहात आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काय गैर आहे? त्यामुळे आता लोकांनाच ठरवू दे की, कोण चूक आणि कोण बरोबर. लोकशाहीत ती प्रत्येकाला संधी आहे. आपण फक्त पाहत राहूया की सावंतवाडीच्या राजकारणात इतिहास पुनरावृत्ती करतो की नवा लिहिला जातो. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि गेली पाच वर्षे नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आलेले बबन साळगावकर या दोन सावंतवाडी सुपुत्रांमध्ये (एकमेकांच्या दोन कट्टर समर्थकांमध्ये) राजकीय लढाई पहायला मिळत आहे. सावंतवाडीत केसरकर आणि साळगावकर यांच्या या राजकीय लढाईचा परिणाम विकासकामांवर होऊ नये म्हणजे मिळविले. कारण शहरात राजकारण आणि समाजकारण एकमेकांमध्ये मिसळून राहिले तर विकास प्रक्रिया वेगाने धावते.
बबनराव आणि दीपकभाई यांच्यात राजकीय वैमनस्य निर्माण होण्याची अनेक कारणे असतील. त्या सर्व कारणांचा ऊहापोह करण्याची गरज नाही. नेमके ते दोघे कशामुळे एवढे एकमेकांच्या विरोधात गेले ते त्यांचे त्यांना माहीत. परंतु या दोघांमध्ये एक महत्त्वाचे कारण किंवा समान दुवा म्हणजे केसरकरांना करायची आहे आमदारकीची हॅट्ट्रीक तर बबनरावांना खुणावतेय विधानसभेचे दार. हे दोघेही आपापल्या पातळीवर योग्य आहेत. मग लोकांनीच ठरवायचे आहे की कोण चूक आणि कोण बरोबर. गेल्या ५० वर्षांचा सावंतवाडी मतदारसंघातील राजकीय इतिहास पाहता विधानसभेत येथील जनतेने दोन टर्मपेक्षा जास्त वेळा आमदार म्हणून कोणालाच संधी दिलेली नाही.शिवराम भोसले हे १९८० (काँग्रेस आय) आणि १९८५ (इंडियन नॅशनल काँग्रेस), माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले १९९० (काँग्रेस) आणि १९९५ (इंडियन नॅशनल काँग्रेस), शिवराम दळवी हे १९९९ आणि २००४ शिवसेना तर दीपक केसरकर हे २००९ (राष्ट्रवादी) आणि २०१४ (शिवसेना) असे आमदारकीच्या दोन टर्म राहिले आहेत. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघाचा हा इतिहास पाहता तिसरी टर्म कोणालाच मिळालेली नाही. त्याला प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील बहुतांश वेळा त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार लोकांनी निर्णय दिला आहे.
दीपक केसरकर यांनी सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून चांगले काम केले होते. त्यावेळी आघाडी सरकारच्या काळात केसरकर यांना त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील नगरपरिषद महासंघाचे अध्यक्षपदही दिले होते. केसरकर ज्यावेळी २००९ मध्ये पहिल्यांदा आमदारकीसाठी राष्ट्रवादीकडे तिकीट मागत होते त्यावेळी त्या स्पर्धेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेदेखील होते. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्याने आणि नारायण राणे काँग्रेसमध्ये मंत्री असल्याने राणेंच्या विश्वासाने पवार यांनी केसरकरांना संधी दिली. त्या काळात केसरकरांचा प्रचार करायलाही राणे समर्थक तयार नव्हते. यावेळी केसरकर यांनी राणेंना विनवण्या केल्या. राणेंनी सावंतवाडीत सभा घेऊन केसरकरांचे काम करा म्हणून कार्यकत्यांना बजावल्यानंतरच केसरकर पहिल्यांदा आमदार झाले. पुढे मग राणे-केसरकर वाद कसा वाढला ते आपल्याला सर्वांना माहितच असेल.
आता केसरकरांच्या पावलावर पाऊल ठेवत नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर बबनरावांना आमदार व्हायचे आहे. त्यामुळे त्यांचे चुकले कुठे? आता त्यांना आमदार व्हायचे आहे म्हटल्यावर ते विद्यमान आमदारांविरोधात बंड पुकारणे साहजिकच आहे. केसरकरांना सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या विश्वासामुळेच दोन वेळा आमदार होता आले. आता साळगांवकरांना तसे वाटू लागले आहे. त्यामुळे केसरकर आणि साळगावकर या दोन कट्टर मित्रांमध्ये राजकीय लढाई रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.आता या लढाईत कोण कोणाच्या बाजूने उभे राहतेय तो येणारा काळच ठरवेल. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार नारायण राणेंची भूमिका काय असणार ? २००९ मध्ये भोसलेंना डावलून केसरकरांना हात देणारे राणे आता प्राप्त परिस्थितीनुसार केसरकरांना हरविण्यासाठी साळगावकरांना हात देतील काय? या अशा राजकीय प्रश्नांची उत्तरे शोधणे सध्या कठीण आहे.सावंतवाडीतील राजकारण इतिहासाची पुनरावृत्ती करणार की नवा इतिहास लिहिणार यासाठी वाट पहावी लागेल. एकंदरीत केसरकर आणि साळगावकर दोघेही आपापपल्या पातळीवर योग्य आहेत. आरोप, प्रत्यारोप, राजकीय चिखलफेक ही होतच राहणार. असे नाही झाले तर त्याला राजकारण कसे म्हणायचे, बरोबर ना....!!!