सावंतवाडी : नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणे कदापि शक्य नाही. पण जिल्ह्यात प्रकल्प आले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. बेरोजगारी वाढत आहे, हे चांगले नाही. त्यामुळे प्रकल्प यावेत या मताशी मी सहमत आहे, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या सुरात सूर मिळवला. तसेच प्रकल्पासाठी मी स्वत: प्रयत्न करेन असे म्हणत, बबनराव, मी तुमच्यासोबतच अशी कोपरखळी मारत खासदार निधीतून नगरपालिकेला १५ लाखांचा निधी जाहीर केला.खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली . त्यांचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले. यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राजू नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, बाबू कुडतरकर, सागर नाणोस्कर आदी उपस्थित होते.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कंत्राटी कामगारांना कायम करा या मागणीचा पाठपुरावा करा, अशी विनंती खासदार राऊत यांच्याकडे केली. त्यावर राऊत यांनी तुमचा प्रश्न चांगला आहे. नक्की पाठपुरावा करू, असे सांगितले. तर नगराध्यक्षांनी जिल्ह्यात रोजगार आला पाहिजे. सगळ्याच प्रकल्पांना विरोध नको, अशी भूमिका मांडली. त्यावर खासदार राऊत यांनी आम्ही नाणार प्रकल्पाला कशासाठी विरोध करतो हे साळगावकर यांना पटवून दिले.तुम्ही रोजगार म्हणत असाल तर नाणारमधून रोजगार निर्मिती होईल. पण ती किती आणि स्थानिक त्यात किती असतील याचा विचार करा. देशात दोन ठिकाणी रिफायनरी आहे. तेथेही मी जाऊन आलो. तर तेथे रोजगार करणारे स्थानिक नाहीत तर ते बाहेरचे आहेत. तुम्हाला कोकणात बाहेरचे येऊन रोजगार करणारे चालतील का? असा सवाल करत प्रकल्प आले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. पण ते कोणते प्रकल्प यावेत यालाही मर्यादा आहे. रोजगारासाठी मी तुमच्याबरोबरच आहे. येथील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या मताशी सहमत असून रोजगार आम्ही उपलब्ध केला नाही तर आम्हाला पुढील पिढी माफ करणार नाही, असे सांगत प्रकल्प यावेत, असे सांगत साळगावकर यांच्या सुरात राऊत यांनी सूर मिळवत रोजगारासाठी काय तरी केले पाहिजे, असेही सांगितले. तसेच नगरपालिकेचे काम खरोखरच चांगले आहे. मला कायम नगरपालिकेबद्दल अभिमान आहे. बबनराव मी तुमच्या सोबतच, असे म्हणत खासदार राऊत यांनी आपल्या खासदार निधीतून पालिकेला पंधरा लाखाचा निधीही जाहीर केला. तसेच नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक हे चांगले काम करीत आहेत, असे सांगत अभिनंदनही त्यांनी यावेळी केले.महामार्ग सावंतवाडीतून गेला पाहिजे होताझाराप-पत्रादेवी हा महामार्ग सावंतवाडीतून गेला पाहिजे होता. त्यामुळे रोजगार निर्मिती झाली असती, असे सांगत सावंतवाडीचे दु:ख आम्ही जाणून आहोत. त्यामुळेच कणकवलीवासियांना शहरातून महामार्ग कसा जाईल हे बघा, अशी सूचना केल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
बबनराव मी तुमच्यासोबतच, रोजगारावरून खासदार राऊत व साळगावकर यांचे सुरात सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:02 AM