सिंधुदुर्ग : जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न मिटला असला तरी ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतील लाखो चाकरमानी वेगवेगळ्या वाहनांतून घरी दाखल झाले आहेत. मात्र, खड्ड्यांची समस्या त्यांची पाठ सोडत नाही. या खड्डेमय रस्त्यातूनच बाप्पांना घरोघरी आणण्यात आले आहे. रस्त्यांची झालेली वाताहात, लोकांसमोर असलेले हे विघ्नं दूर करण्याची प्रार्थना विघ्नहर्त्याला घालावी लागत आहे.मालवण तालुक्याचा विविध भाग, कुडाळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते, कणकवली तळेरे ते वैभववाडी मार्ग, कणकवली तालुक्यातील कनेडी, नाटळ, सांगवे मार्गावर, फोंडा मार्गावर, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव, दाणोली, आंबोली मार्गावर, दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भाग असे सर्वच ग्रामीण भागातील रस्ते उखडून गेले आहेत.
धक्के खात गावातग्रामीण भागातील रस्तेही खड्डेमय झाल्याने गावापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सवासाठी गावी न आलेले मुंबईकर यंदा जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. मात्र, उत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करत धक्के खात गावात प्रवेश करावा लागत आहे.
रस्त्यावर जागोजागी तळेयावर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी तळे साचले. कोट्यवधीचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्ती केली जात नाही. मग या निधीचे काय केले जाते, कोणत्या कामासाठी निधी खर्च होतो, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोट्यवधींचा निधी जातो कुठे ?पावसाळ्यात हे खड्डे भरले जात नाहीत. खड्ड्यांभोवती जमा झालेली खडी, वाळूही हटवली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर तळे साचले आहेत. ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. मग कोटींचा निधी कुठे खर्च केला जातो, असा प्रश्न केला जात आहे.
मालवण तालुका खड्ड्यात हरविलामालवण तालुक्यातील बेळणे, राठीवडे, पोईप, विरण, बागायत मार्गे बिळवस, महान, आडारी रस्त्यावर बहुतांश भागात रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. आचरा, वायंगणी, हडी मालवण या मार्गाची तशीच अवस्था आहे. कणकवली आचरा मागर्गावरील बराचसा भाग खड्ड्यांनी व्यापला आहे. कुणकवळे, चाफेखोल, गोळवण, वडाचापाट म्हणा किवा चाैके आबंडोस माळगाव या मार्गावरही रस्तेच खड्ड्यात हरविले आहेत.
घाटरस्ते बनले बेभरवंशीसिंधुदुर्गात येणारे आंबोली, गगनबावडा (करूळ) किवा फोंडा या तिन्ही घाटमागर्गावरील रस्ते बेभरवंशी आहेत. याठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका तर आहेच. परंतु या घाटरस्त्यांना जोडणारे सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
काही भागात खड्ड्यांमुळे रस्ताच गायबआधीच रस्ते नादुरुस्त झालेले असताना धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. काही भागात खड्ड्यांमुळे रस्ताच गायब झाला आहे. रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी होत असली तरी जिल्हा परिषदेकडे निधीच नसल्याने रस्ते दुरुस्त कसे होणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.