दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : “किंग कोब्रा” साप पकडल्या प्रकरणी संशयित युवकाचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नाकारण्यात आला आहे. राहुल विजय निरलगी (रा.दोडामार्ग) असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याला आज, गुरूवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, पाळये-दोडामार्ग येथे राहुल याने किंग कोब्रा हा विषारी जातीचा साप पकडला होता. या प्रकाराची माहिती अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आल्यानंतर वनविभागाने राहुल याला सहकार्य करण्याची विनंती केली होती. मात्र उलट उडवा-उडवीची उत्तरे देत त्याने “त्या” सापा सोबत छायाचित्रण करणे तसेच खेळणे असे प्रकार केले होते. त्यानंतर आपण तो साप नैसर्गिक अधिवासात सोडला, असे सांगितले.त्या संदर्भात वन अधिकाऱ्यांनी पुरावे मागितले असता आपल्या मोबाईलमध्ये तसा व्हिडिओ आपण काढला होता. परंतु आता माझा मोबाईल हरवला आहे, असे त्यांनी सांगितले. यावरून त्याच्यावरील संशय आणखीन बळावला होता. त्यामुळे त्याला ६ सप्टेंबरला ताब्यात घेण्यात आले.तर बुधवारी त्याला न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी दिली होती. दरम्यान गुरुवारी त्याच्या वकिलांकडून जामीन अर्ज करण्यात आला होता. मात्र तो नाकारत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
किंग कोब्रा साप पकडणाऱ्या 'त्या' युवकाचा जामीन अर्ज नाकारला, न्यायालयीन कोठडीत रवानगी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 08, 2022 6:30 PM